जळगाव : रामेश्वर कॉलनीतील सहा वर्षीय बालीकेला गरम सराट्याने चटके लावुन अनन्वीत अत्याचार केल्या प्रकरणी मुलीची आई व मावशीला झोडपल्यावर आईच्या प्रेमीचे काळे तोंड करीत महिलांनी बदडुन काढल्याची घटना गुरूवारी घडली होती. तर चिमुकलीला शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या ताब्यात घेतले होते. शुक्रवारी एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चिमुकलीला महिला सदस्यांकडून ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. तर चिमुकलीच्या आई व तिच्या प्रेमीला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
अशी होती घटना
मेहरुणच्या रामेश्वर कॉलनीतील भाड्याच्या घरात आई व त्याच्या प्रेमी सोबत वास्तव्यास असलेल्या सहा वर्षीय पुजा बापुराव पाटील या बालीकेच्या शरीरावर ठिक ठिकाणी चटके लावुन दागल्याचा प्रकार गुरूवारी समोर आला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी मुलीची आई अश्वीनी मावशी मुक्ताबाईला गल्लीत बेदम झोडपल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केले. तदनंतर मुलीने सांगीतल्या प्रमाणे तीच्या आईचा प्रेमी प्रमोद ऊर्फ भैय्या बिडकर (पाटील) हा काम करीत असलेल्या प्लॅस्टीक दाना फॅक्ट्री गाठून त्याचा शोध घेण्यात आला. तेथून बोलावुन आणत त्यालाही महिलांनी बेदम झोडपले. काळे तोंड करुन तुडवल्यावर त्याला पोलिसांच्या स्वधीन करण्यात आले होते.
पोलीसांना शिवीगाळ
शुक्रवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रामेश्वर कॉलनी येथे घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले होते. मात्र, शिवसेना महिला आघाडीच्या सदस्यांनी चिमुकलीच्या घराला कुणाला न विचारता कुलूप लावले होते. सकाळी पोलीस आल्यानंतर त्यांना तासभर तात्काळत बसावे लागले. यानंतर महिला आघाडीच्या शोभा चौधरी ह्या आल्यानंतर पोलीसांना त्यांना कुलूपाबाबत विचारणा केली असता चौधरी यांनी पोलीसांनाच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पोलीसांनी पंचनामा करून चौधरी यांच्याकडून चिमुकलीला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीसांनी दिली.
दोघांचा जामीन मंजूर
चिमुकली पुजा हिची आई अश्विनी व प्रियकर प्रमोद पाटील याला एमआयडीसी पोलीसांनी दुपारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीश बी.डी.गोरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतू आरोपीपक्षातर्फे जामीनासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंर न्या. बी.डी.गोरे यांनी दोघांना 15 हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, पोलीसांनी पुजा हिला बाल सुधारगृहात पाठवले आहे.