बारामती । बनावट आदेशपत्राचा वापर करून जप्त केलेले वाळूचे ट्रक सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील ट्रकमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे असे प्रकार घडू नये, यासाठी बारामती आणि इंदापूर तहसीलदारांनी कोणत्याही पत्रव्यवहाराची खात्री केल्याशिवाय पुढील निर्णय घेऊ नये, अशा सूचना केल्याची माहिती प्रांताधिकारी नीलेश निकम यांनी दिली.
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या दंडात्मक कारवाईच्या अगोदरच सोडून दिल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बनावट पत्रादेशाचा वापर केल्याचे निदर्शनास येत असून त्याबाबतची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती निकम यांनी दिली. त्यामध्ये दोषी आढळणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून हा प्रकार उघड झाला. अन्यथा या पुढे देखील असे प्रकार घडतच राहिले असते, असे त्यांनी देखील मान्य केले. या प्रकरणात आमच्याकडून कोणतीही परवानगी अथवा आदेश दिलेले नाहीत. वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपालिकाप्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनअधिकारी, पोलीस आदी खात्यांना पत्रव्यवहार करून बेकायदा वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाईसाठी सहकार्य करण्याच्या सूचना केल्याने त्यांनी पुढे सांगितले.
तिघांवर गुन्हा दाखल बारामती शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. बारामतीच्या मंडल अधिकारी स्वाती गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ अरुण वाघमोडे, बापू गणपत भापके, संतोष जालिंदर पठारे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक अनेक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु कारवाई फक्त तिघांवरच करण्यात आल्याचा आरोप किशोर मासाळ व इतर सहकार्यांनी केला आहे. याबाबत उपोषण करणार असल्याचे मालपाणी यांनी सांगितले.