त्या तरुणीच्या वडिलांना अटक; तरुणी मात्र फरारच

0

इंदापूर – पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या नीरा-नृसिंहपूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या गावात “न्यायालयाने बलात्कारानंतर जामिनावर सोडलेल्या त्या बलात्काऱ्याला मुलीने वडिलांच्या सहाय्याने बलात्काराचा बदला घेत त्याला यमसदनी पाठवले होते.” त्यातील मुलीच्या वडिलांना अटक करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती मच्छिंद्र काळे असे त्याचे नाव असून, तो आपल्या शेतातच लपून बसल्याची माहिती खबऱ्यामार्फत इंदापूर पोलिसांना मिळाली. यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सजन हंका
रे यांनी आपले सहकारी संजय जाधव व पथकासमवेत रात्री आठच्या सुमारास आरोपीच्या शेताला चारही बाजूंनी वेढा देत, पूर्णं शेत पिंजून काढत, लपून बसलेल्या आरोपीला शोधून काढले.

त्याला इंदापूर न्यायालयात हजर करण्यात केले असता, त्यास दि.१७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत. मात्र सदरील तरुणी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेली नसून, तिचा कसून शोध सुरु आहे. पोलिसांची निरनिराळी पथके तिचा शोध घेत असून, खबऱ्याचे जाळे देखील पसरवण्यात आले असल्याची माहिती समोर येते आहे.

काय आहे घटना
नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा-नृसिंहपूर, ता. इंदापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत तरुण आणि आरोपी हे एकमेकांचे नातलग असून शेजारी शेजारी रहातात. पीडित मुलीने दि. १० एप्रिल २०१७ रोजी नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात श्रीकांत घळके याला अटक करण्यात आली होती. तर मयत नीलेश अल्पवयीन असल्याने त्याला त्या वेळी पुण्यातील बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथेच त्याचा जामीन झाला होता.

यामुळे पिडीतेचे वडील आणि पीडिता त्याच्यावर चिडून होते. त्यांच्या घरी जाऊन ते सतत “न्यायालयाने त्याला सोडले असले, तरी आम्ही सोडणार नाही”, अशी धमकी देत होते. त्यानंतर घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी मयत नीलेश याला इंदापूर येथेच शिक्षणासाठी ठेवले होते. दरम्यान नीलेशची परीक्षा संपल्याने तो गुरुवार (दि.१०) दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आतल्या खोलीत गेलाच होता. एवढ्यात हातात कोयते घेऊन बलात्कार पिडीत मुलगी आणि तिचे वडील निलेश याच्या घरात घुसले. त्यांनी घरात निलेशचा शोध सुरु केला.

यावेळी नीलेशच्या आई वडीलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पिडीतेच्या वडिलांनी नागनाथ घळके यांच्या हातावर व कपाळाच्या डाव्या बाजूला कोयत्याने वार केले. तर पीडित मुलीने मयत निलेशची आई सुनीता घळके यांच्या छातीवर वार केला. आपल्या कुटुंबीयांवर हल्ला झाल्याचे लक्षात येताच मयत नीलेश हा घरालगत असणाऱ्या दुकानाच्या शटरमधून मागच्या बाजूने पळून गावाच्या मुख्य रस्त्याने चौकाकडे धावला. मात्र हे लक्षात येताच त्या बाप-लेकीने त्याचा पाठलाग करत, त्याला चौकात गाठले.

यावेळी पिडीत मुलीच्या वडिलांनी नीलेशच्या डाव्या व उजव्या हातावर, गालावर व गळ्यावर सपासप वार करत त्याला जखमी केले. यावेळी झालेले कोयत्याचे घाव एवढे घातक होते, की त्याच्या डाव्या हाताचा पंजा हातावेगळा होऊन बाजूला पडला होता. यानंतर मुलीचा बाप घटनास्थळावरून निघून गेला. मात्र पीडित मुलगी निलेश पूर्णपणे मयत झालाय का हे पाहण्यासाठी तिथेच थांबली होती.

मयत निलेशच्या आईला जीवे मारण्याची जाहीर धमकी
दरम्यान निलेशचे आई, वडील त्याच्या पाठोपाठ घटनास्थळावर पोचले. यावेळी त्या पिडीतेने मयत निलेशच्या आईला “यावेळी तू वाचली आहेस, पण तुझ्या घरादाराला सोडणार नाही” अशी धमकी देऊन ती तेथून निघून गेली.

याबाबत मृत नीलेशची आई सुनीता नागनाथ घळके (रा. नीरा-नृसिंहपूर) यांनी इंदापूर पोलीस तक्रार दिली आहे. मुलीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले असले, तरी भर चौकात जाहीर धमकी देणारी ती मुलगी अद्याप हाती आलेली नाही. त्यामुळे मयत निलेश याचे कुटुंबीय अद्यापही धास्तावलेले आहेत.