जळगाव । शहराच्या मेहरूण परिसरातील कुंभारवाड्यातील तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली होती. दरम्यान, त्याचे परिसरातील एका मुलीशी प्रेमसंबध होते. तिच्याच नातेवाईकांनी त्याची हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची करण्यात यावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत मयताच्या नातेवाईकांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात किरकोळ गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून चौकशीत दोषी आढळणार्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची मृतदेह ताब्यात घेतला.
तरूणाचा संशयास्पद मृत्यू
तरूणाचा 6 वाजेच्या सुमारास एमआयडीसीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या खिशात राखाडी रंगाच्या पावडरची पुडी सापडली होती. मिलिंदचे परिसरातील युवतीशी प्रेमसंबंध होते. तिच्या नातेवाईकांनी दोन महिन्यापूर्वी मिलिंदला मारहाण केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांनीच मिलिंदचा घातपात केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी सोमवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उप निरीक्षक रोहन खंडागळे यांनी नातेवाईकांची समजून काढल्यानंतर या वादावर पडदा पडला. त्यानंतर सोमवारी सकाळी 11.30 वाजता मिलिंदच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन 12.30 वाजेच्या सुमारास त्याचावर अंत्यसंस्कार केले.
कंपनीच्या अधिकार्यांचीही चौकशी करा
मिलिंद ज्या कंपनीत काम करीत होता. त्या कंपनीचा एकही अधिकारी घटना घडल्यापासून कुटुंबियांना भेटण्यासाठीही आला नाही. त्यामुळे त्याचे मामा सुनील सावकारे आणि विजय सावकारे यांनी कंपनीच्या अधिकार्यांवर संताप व्यक्त केला. मिलिंद कामावर असताना दुपारी 3 वाजेपासून तो कंपनीत नव्हता. त्यांनी साधा तपासही केला नाही. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.