‘त्या’ पोलीस निरिक्षकासह कर्मचार्‍यांवर निलंबनानंतर बडतर्फची कुर्‍हाड

0

जळगाव – लॉकडाऊनच्या काळात आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यांसह पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित सर्वांच्या चौकशीसह तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आले. एसआयटीकडून संबंधितांचे फोन, रेकार्डिंग, आर.के.वाईन्सच्या मालकांसह पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आले. यात थेट सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरिक्षकासह संबंधित चार कर्मचार्‍यांना याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. संबंधित सर्वांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्या आधीचे कामगिरी, तसेच रेकार्ड तपासून पोलीस रणजीत शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव,व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांना सेवेतून बडतर्फ क रण्याबाबतचाही प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असून त्यानुसार संबंधितांवर बडतर्फची कुर्‍हाड कोसळणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

बियर विक्रीत 50 टक्के भागीदारीचा तोंडी करार

फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चाटींग तसेच आर.के.वाईन्स संबधित मालक यांच्या जबाबावरुन पोलीस निरिक्षक रजणीत शिरसाठ यांची आर.के.वाईन्समध्ये भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले. हद्दीतल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक असल्याने कारवाईपासून वाचण्यासाठी शिरसाठ यांच्या भागीदारीची ऑफर मालकाने कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सहजपणे स्विकारली. पूर्ण मद्य विक्रीत नव्हे तर फक्त बियरच्या विक्रीतून येणार्‍या एकूण नफ्यात 50 टक्के भागीदारी असा तोंडी करार असा शिरसाठ व नोतवाणी यांच्यात सहा महिन्यांपूर्वी झाला होता. सहा महिन्यांपासून यानुसार व्यवहार सुरु होते. हद्दीतील पोलीस निरिक्षकच भागीदार असल्याने लॉकडाऊनच्या काळात बंदी असतांना मद्य विक्रीची हिंमत आर.के.वाईन्सच्या मालकाने केली. नको त्यावेळी व नको त्या गोष्टीत केलेली ही हिंमतच मालकासह सहभागी सर्वाच्याच अंगलट आली. आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द झालाच व शिवाय गुन्हा दाखलसह इतर कारवाईला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर आली.

कर्मचारी अवैधमद्य साठ्याची वाहने पास करुन द्यायचे

एसआयटीच्या तपासात आर.के.वाईन्स प्रकरणात रणजीत शिरसाठ, पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने गुरुवारी पाचही जणांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. अवैधपणे मद्य साठा वाहनांमधून आणतांना, संबधितांवर वाहनांवर कुठलीही कारवाई होवू नये किंवा ते विना कारवाई पास व्हावे, ही जबाबदारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे याची कर्मचार्‍यांवर होती. या कामापोटी कर्मचार्‍यांना ठरावीक पैशांची तसेच महागड्या मद्याच्या बाटल्यांची बक्षीसी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

निलंबनानंतर बडतर्फचाही प्रस्ताव

आर.के.वाईन्स प्रकरणात फोन संभाषण, व्हॉटस्अ‍ॅप चॅट या व्दारे प्रत्येकाचा नेमका काय सहभाग याबाबतही एसआयटीने सखोल चौकशी केली. यात मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव हे अवैध मद्याची वाहने कारवाईपासून वाचविण्यासाठी तसेच सोडण्यासाठी सहकार्य करत असल्याचे समोर आले. चौकशीत मनोज सुरवाडे याची शहरातील एका हॉटेलातही भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आर.के.वाईन्स प्रकरणात सहभागानुसार आरोपी करण्यात आलेल्या सर्वांवर निलंबनाची कारवाई निश्‍चित आहे. यात पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव या चौघांवर निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ
करण्याचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तालुका पोलीस ठाण्याचे भारत पाटील या कर्मचार्‍याने स्वतःसह इतरांसाठी मद्य मागितल्याचे फोन संभाषणावरुन समोर आले. मद्य मागितल्याव्यतिरिक्त आर.के.वाईन्स प्रकरणात कुठलाही भारत पाटील यांचा कुठलाही सहभाग नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर सौम्य कारवाईची शक्यता आहे.

पोलीस निरिक्षक मुख्यालयात जमा

रणजीत शिरसाठ यांच्यासह जीवन पाटील, संजय जाधव, भारत पाटील व मनोज सुरवाडे यांच्या आवाजाचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. पडताळणीसाठी ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. मुंबईला कोरोनामुळे प्रयोगशाळा बंद आहे त्यामुळे हे नमुने तपासणीत विलंब होणार आहे. मात्र तरीही आवाजाचे नमुने तपासणीस विलंब होणार असला तरी गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधितांवर खात्याअंतर्गत होणारी कारवाई टळणार नाही, अशीही माहिती आहे. शनिवारी उशीरापर्यंत सर्वांच्या निलंबन होण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक यांची मुख्यालयात जमा करण्यात आले असून त्यांचा पदभार पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे देण्यात येणार आहे. शिरसाठ यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर दोन ते तीन दिवसात नवीन पोलीस निरिक्षकाची नियुक्ती होणार असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.