त्या ‘बॅटमन’ आमदाराला चपराक; विरोध असलेली इमारत जमीनदोस्त

0

भोपाळ: जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि माध्यमांतून आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या गुंडगिरीवरुन मोठी टीका झाली होती. त्यामुळे आकाश यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान आता आमदार आकाश विजयवर्गीय यांना जबरदस्त चपराक बसली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी अखेर ती इमारत उद्धवस्त केली आहे.

इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, आकाश यांना अटकही झाली होती. मात्र, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी अखेर आज त्या जीर्ण झालेल्या इमारतीवर जेसीबी फिरवला. तसेच परिसरातील जीर्ण झालेली इमारतही पूर्णपणे उद्धवस्त केली.