‘त्या’ माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दफनविधी

0

यवत । दौंड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निसार जब्बार शेख (वय46) यांनी 1 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर त्यांनी व्हीडीओ क्लिप बनवून दोषींना अटक होत नाही तोपर्यंत दफनविधी करायचा नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. दोषींच्या जामीनावर येत्या सोमवारी सुनावणी होणार असल्याने शुक्रवारी शेख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आत्महत्या करण्यापुर्वी शेख यांनी त्यांच्या जबाबाची व्हिडिओ क्लिप त्यांच्या मित्र परिवार व नातलगांना पाठवली होती. त्यात त्यांनी नगरसेवक वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मशिदीचे विश्‍वस्त अशी एकूण 11 जणांची नावे घेऊन त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. या सर्वांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या मृतदेहावर दफनविधी करू नये, असे शेख यांनी म्हटले होते. त्यामुळे शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या 11 जणांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास मृताच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यामुळे दौंड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आरोपी फरार; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
या घटनेनंतर सर्व आरोपी फरारी झाले होते. यानंतर दौंड पोलिसांनी शेख यांचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता. संशयीत आरोपींची जामीन अर्जावरील सुनावणी 12 फेब्रुवारीला रोजी ठेवण्यात आली असल्याने निसार शेख यांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी दफनविधीचा निर्णय घेतला. त्यानुसार 9 व्या दिवशी दफनविधी करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.