‘त्या’ रात्री जावयाचा होता फोन

0

जळगाव । 30 तारखेच्या रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आपल्याला जावई डॉ. उत्तमराव महाजन यांचा फोन आला. त्यावेळी ते म्हणाले, लवकरात लवकर 25 लाखाची व्यवस्था करून द्या, त्याशिवाय माझी सुटका होणार नाही,असे ते म्हणाले,अशी माहिती महाजन यांचे सासरे डिंगबर पांडू माळी यांनी बुधवारी न्यायालयात साक्षीतून दिली.

डॉ. उत्तमराव महाजन खंडणी प्रकरणी आज माळी यांची सरतपासणी घेण्यात आली. डॉ. महाजन फोनवर बोलताना म्हणाले, सकाळपासून त्यांना मनोज लोहार यांच्या कार्यालयात थांबून ठेवले आहे. पैसे दिल्याशिवाय माझी सुटका होणार नाही, अशी माहिती माळी यांनी साक्षीतून दिली. त्याच रात्री डिंगबर माळी हे शिरपूर येथुन चाळीसगाव येथे आले. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातून दोन पोलिस अधिकारी, तीन साध्या वेषातील पोलिस कर्मचारी उतरत असताना त्यांच्यात डॉ. महाजनही होते. त्यावेळी जावयांशी पैश्यांबाबत चर्चा केली.नंतर महाजन यांना ज्या घरात नेले, त्याघरातून काही अवधीनंतर पांढरे कपडे घातलेली व्यक्ती बाहेर पडली. व कारमधुन मार्गस्थ झाली. आपणही त्या कारमध्ये गेलेा असता बसस्टॅन्डजवळ त्या व्यक्तीस गाठुन आपण डॉ. महाजन यांचे सासरे असल्याची ओळख करून दिली. त्यावेळी धीरज येवले, असे त्यांनी त्यांचे नाव सांगीतले. साहेबांना 25लाख मिळाल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही, असे ते म्हणाले होते. आज डिंगबर माळी यांनी येवले यांच्यासह पीएसआय निंबाळकर यांना न्यायालयात ओळखले.