‘त्या’ लोकप्रतिनिधींवर होणार गुन्हे दाखल

0

पुणे : शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा, विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांवर याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शहरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास त्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यांना दिले आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम 2013 तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, फलक लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही परंतु त्यानंतरदेखील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चौका-चौकांत, काही मोक्याच्या ठिकाणी विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीनंतर अभिनंदनाचे, विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण शहरभर अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जाते. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा 1995 अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दोन नगरसेविकांविरोधात गुन्हा दाखल

प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. या अंतर्गत महापालिका भवन समोर फुटपाथवर अनधिकृतपणे वाढदिवसांचे फ्लेक्स लावणार्‍या दोन नगरसेविकांच्या विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. परंतु त्यानंतर प्रशासनावर कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जातो. आता अशी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकार्‍यांवरच कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सहकार्याचे आवाहान

कार्यकर्त्यांकडून वाढदिवस तसेच अभिनंदनाचे फ्लेक्स शहरात रस्ते पदपथ तसेच चौकात बांबूचे पहाड उभारले जात आहेत. त्यावर राजकीय नेत्यांसह पक्षांची नावेही आहेत. या जाहिरातींना महापालिकेची कोणतीही मान्यता घेतली जात नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असून महापालिकेचीही नाहक बदनामी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन अशा प्रकारे अनधिकृत जाहिराती लावल्या जाणार नाहीत, यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पत्रातून करण्यात आले आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिसादाकडे लक्ष

महापालिकेने राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली असली, तरी त्याला किती प्रतिसाद मिळतो हे राजकीय पक्षांच्या भूमिकेवर ठरणार आहे. कार्यकर्ते आपल्या प्रेमापोटी फ्लेक्स लावतात, असे सांगत राजकीय नेत्यांकडून या प्रकाराचे समर्थन केले जाते. तर महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यास असे प्रकार करण्यात येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या जाहिरातींना आळा बसत नसल्याचे चित्र आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत, लोकप्रतिनिधींना कळविण्यात आले आहे. त्यानंतरदेखील सध्या शहरामध्ये विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्त्यांनंतर अभिनंदन करणारे फ्लेक्स, बॅनर लावले जातात, परंतु आता यापुढे अशा प्रकारची जाहिरातबाजी करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार व सर्व पक्षांचे अध्यक्ष यांना लेखी पत्र देऊन याबाबत सांगण्यात आले आहे.
राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका