‘त्या’ सल्लागारावर खुलाशानंतर कारवाई

0

पुणे । महापालिकेडून पुणेकरांना 24 तास समान पाणी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या समान पाणी योजनेच्या सल्लागार कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानुसार खुलाशानंतर सल्लागार कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यसभेत दिली.

महापालिकेच्या सायकल योजना तसेच स्वच्छता उपविधीसाठी गुरुवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी मागील सभेत आज सल्लागाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपाचा खुलासा करावा अशी मागणी केली. मात्र, आज वेगळ्या विषयाची खास सभा असल्याने त्या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते चेतन तुपे आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी आधी खुलासा करण्याची मागणी केली. परंतु विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसताच सभागृहनेते आणि महापौरांनी चर्चा करून खुलासा करण्याची तयारी दर्शविली. तसेच खुलासा झाल्यानंतर कोणतीही चर्चा होणार नाही तसेच कोणताही प्रश्‍न विचारणार नाही, अशी अट घातली. त्यामुळे विरोधकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा खुलासा केला. त्यामुळे या योजनेसाठी सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या एसजीआय या सल्लागार कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून कंपनीच्या खुलाशानंतर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.