‘त्या’ हातगाडी, पथारीवाल्यांचे पालिकेतर्फे बायोमेट्रिक सर्वेक्षण

0

पुणे । ज्या हातगाडी, पथारीवाल्याचे बायोमेट्रिक सर्वेक्षण राहिले आहे त्याचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापौरांनी याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

हातगाडी, फेरीवाले, पथारीवाले, स्टॉलवाले संघटना, दिलासा जन विकास संस्था यांनी याबाबत मागणी केली होती. महापौरांनाही त्यांनी निवेदन दिले होते. त्यामुळे महापौरांनी याबाबत प्रशासनाकडे तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्यातून उरलेल्या व्यावसायिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. पथविक्रेता अधिनियम 2014 अंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात येणार आहे. वास्तविक बायोमेट्रिक नोंदणी राहिलेल्यांची संख्या प्रत्यक्षात फारशी नाही. ज्यांच्याकडे विक्रीचे परवाने आहेत त्यांना आपली बायोमेट्रिक नोंदणीची गरज नाही, असे वाटून ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांच्याविषयीचाच प्रश्‍न प्रामुख्याने राहिल्याचे, अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

अर्ज करण्याचे आवाहन
जाणीव संघटना आणि दिलासा जनविकास संस्था यांनी शहरातील तसेच उपनगरातील व्यावसायिकांना संघटनेच्या कार्यालयात अर्ज आणून देण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधीची अधिक माहिती संघटनेच्या नारायण पेठ येथील कार्यालयात सकाळी 10 ते 12 या वेळेत दिली जाणार आहे. जाणीव संघटना तथा सदस्य शहर फेरीवाला समितीला कागदपत्रांसह भेटावे, असेही आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. याशिवाय 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील जाणीव संघटना आणि दिलासा जन विकास संस्थेच्या विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून चौकशी करावी, असेही आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

धोरण निश्‍चिती अंतिम टप्प्यात
पथारी व्यावसायिक धोरण निश्‍चिती अंतिम टप्प्यात असल्याने आता संपूर्ण शहरात 80 ठिकाणे अंतिम करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी दोन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वेक्षणाची आकडेवारी आणि जागांची माहिती आली नव्हती. ती माहिती उपलब्ध झाली असून, प्रभाग समितीमध्ये त्यांना अंतीम मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर आणि उपनगरातील जागा आता निश्‍चित झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच महापालिका मुख्यसभेत या धोरणाला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.