त्रिपुरात जेव्हा भाजपला जाग येते!

0

त्रिपुरा राज्यात पारंपरिक मतदार हा माकपचा असून, भाजपला येथे सत्ता आणायची आहे, त्यादृष्टीने भाजपची राजकीय रणनीती सुरू झाली आहे. देशात आत्तापर्यंत आश्‍वासनाशिवाय काहीच नवे न केल्यामुळे भाजपविरोधात देशातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत, तरीही भाजप त्रिपुरासारख्या माकपच्या बालेकिल्ल्यात मोठमोठी आश्‍वासने देत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारला पायउतार करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, भाजपने आक्रमक प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी थेट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आव्हान दिले आहे. येथील मतदारांना मतदानापासून रोखले जात असून, यावेळी माकपची लढत थेट भाजपबरोबर असून माकपने स्वत:ला सांभाळावे, असा इशाराही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे तसेच भाजप हिंसाचाराला बिलकूल घाबरत नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्रिपुरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शहा यांनी स्थानिक माकपला थेट आव्हानच दिल्याचे दिसत आहे. भाजपला त्रिपुरातील हिंसाचाराचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करायचे आहे, असे मतदारांना भावनात्मक आवाहन शहा यांनी केले आहे. इथे स्टॅलिन आणि लेनिनची जयंती साजरी केली जाते. पण रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंदांची नाही. तुम्ही भाजपला एकदा संधी देऊन पाहा. पाच वर्षांत आम्ही त्रिपुराला मॉडेल राज्य बनवू, असा विश्‍वासही अमित शहा यांनी सभेत व्यक्त केला आहे. थोडक्यात, भाजपाला येथील राजकीय सत्ता बदलायची आहे, असे दिसत आहे. त्रिपुरामध्ये अनेक वर्षे कम्युनिस्टांचे सरकार आहे. येथील सरकारी नोकरदारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते का, असा कळीचा सवालही अमित शहांनी उपस्थितांना विचारला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सरकारी नोकरदारांच्या वेतनात वाढ झालेली नाही. तोच मुद्दा भाजप या निवडणुकीत वापरताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात त्रिपुराच्या दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्रिपुरातील नागरिकांनी ‘माणिक’ऐवजी ‘हिरा’ स्वीकारावा असे आवाहन केले होते. दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या बैठकीदरम्यान पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांची राजकीय शैली ही लोकशाही विरोधी असल्याची टीका केली. राफेल सौद्यासंबंधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक प्रश्‍न विचारून भंडावून सोडले होते. पण यावर बोलताना शहा यांनी समयसूचकता बाळगून, ‘ प्रत्येक गोष्टींबाबत चर्चा करणे देशहिताचे नसते’, असे सावध उत्तर काँग्रेसला दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीप्रमाणे विदेश दौर्‍यावर गेले आहेत. सरकारला संसदेत विरोधकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केल्यामुळे मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. विरोधकांच्या आक्रमकपणासमोर मोदी सरकार हतबल होताना दिसत आहे. राफेल सौद्याबरोबरच रेणुका चौधरींच्या हसण्यावर मोदींनी केलेल्या वक्तव्याचाही काँग्रेसने भरपूर समाचार घेतला आहे. आता त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वोत्तर राज्य काबीज करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्रिपुरातील जनतेला मागील 25 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीचे सरकार उखडून फेकण्याचे आवाहन केले होते. त्यांनी मुख्यंत्री माणिक सरकार यांच्यावर हा करताना राज्यातील जनतेने चुकीचा ‘माणिक’ परिधान केला असून, यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

राज्याला आता ‘माणिक’ऐवजी ‘हिर्‍या’ची गरज आहे, असल्याचे म्हटले. त्रिपुरातील सोनामुरा येथील प्रचारसभेत मोदींनी ही टीका केली आहे. डावे पक्ष लाठीने लोकशाही चालवतात. त्रिपुरा सरकारने राज्यात विरोधात बोलणार्‍या लोकांमध्ये भय निर्माण केले आहे. मोदींच्या बोलण्यातील, हिर्‍याचा अर्थ एच म्हणजे हायवे, आय म्हणजे आयवे, आर म्हणजे रेल्वे आणि ए चा अर्थ एअरवे असल्याचे दिसते. 1996 नंतर त्रिपुरातील सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात बदल करण्यात आलेले नाहीत, हे ऐकून मला आश्‍चर्याचा धक्का बसला, असा गंभीर आरोपही पंतप्रधानांनी केला आहे. भाजप विविध आश्‍वासने देऊन मतदारांना गोंजारत असल्याचे दिसत आहे. त्रिपुरा राज्यात पारंपरिक मतदार हा माकपचा असून भाजपला येथे सत्ता आणायची आहे, त्यादृष्टीने भाजपची राजकीय रणनीती सुरू झाली आहे. देशात आत्तापर्यंत आश्‍वासनाशिवाय काहीच नवे न केल्यामुळे भाजपविरोधात देशातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत, तरीही भाजप त्रिपुरासारख्या माकपच्या बालेकिल्ल्यात मोठमोठी आश्‍वासने देत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

– अशोक सुतार
8600316798