त्रिपुरात धार्मिकस्थळाचे नुकसान झालेले नाही ; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील काकराबन भागातील एका मशिदीचे नुकसान आणि मोडतोड झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्या खोट्या असून, यात तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन केले आहे, असे केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे, की काकराबन  येथील दर्गाबाजार भागातील मशिदीचे कोणतेही नुकसान झालेले नाही आणि गोमती जिल्ह्यातील त्रिपुरा पोलीस शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडच्या काळात त्रिपुरातील कोणत्याही मशिदीच्या संरचनेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोप केल्याप्रमाणे या घटनांमध्ये किरकोळ किंवा गंभीर दुखापत किंवा बलात्कार किंवा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. असे पी आय बी ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. शांतता राखावी आणि अशा खोट्या बातम्यांमुळे दिशाभूल होऊ देऊ नये.

सामाजिक सौहार्द टिकवावे
महाराष्ट्रात त्रिपुरासंदर्भातील खोट्या बातम्यांच्या आधारे हिंसाचार तसेच शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने काही अयोग्य वक्तव्ये झाल्याचे वृत्त आहे. हे अतिशय चिंताजनक असून  कोणत्याही परिस्थितीत शांतता राखली जावी असे आवाहन करण्यात आले आहे.