त्रिपुरा निवडणुकीत एका पुणेकराने मिळवून दिले भाजपला यश

0

सुनील देवधर मुळचे पुण्याच्या नारायण पेठेतील
2013 च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या होत्या केवळ 2 जागा

आगरतळा : त्रिपुरात डाव्यांचा पराभव करत भाजपने सत्ता हिसकावून घेतली आहे. मागील निवडणुकीत अवघी एक जागा मिळवणार्‍या भाजपने या निवडणुकीत 43 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. या यशामागे एक मराठी चेहरा आहे, तो म्हणजे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर. भाजपने त्रिपुराच्या प्रभारीपदी सुनील देवधर यांची सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी नियुक्ती केली होती. 2013च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे केवळ 1.54 टक्के मते पडली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय देवधर यांच्याकडे जात आहे. 52 वर्षीय सुनील देवधर मुळचे पुण्यातील नारायण पेठेतले आहेत. मात्र, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या परांजपे महाविद्यालयातून झाले. त्यांचे शिक्षण एमएससी बीएड झाले आहे. महाविद्यालयात असतानाच ते संघाच्या संपर्कात आले.

संघ परिवारातील सुनील देवधर
देवधर हे मेघालयात 8 वर्षे संघाचे प्रचारक होते. खासी, सिल्हेटी बांगला, थोडीफार नेपाळी, असमिया या भाषा त्यांना येतात. 2012 मध्ये गुजरात निवडणुकीत दाहोद जिल्ह्याची आणि 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी देवधर यांनी पेलली होती. सहा महिने देवधर यांनी दोन वेळा संपूर्ण त्रिपुरा पिंजून काढला. कानाकोपर्‍यात जाऊन समस्यांची माहिती घेतली. विप्लव देव या तरूणाला प्रदेशाध्यक्षपदी आणून प्रदेश भाजपची नवी टीम बांधली. देवधर यांचा निवास असलेली आगरतळा येथील शाम्लिमा बिल्डिंग भाजपच्या प्रचारकार्याचे केंद्र बनली आहे. मनरेगाअंतर्गत बनलेले कागदोपत्री रस्ते, शेततळी आणि बंधार्‍यांमधील भ्रष्टाचार आणि रोझव्हॅलीसह कित्येक घोटाळ्यांचा ते सोशल मीडियावर सातत्याने भांडाफोड करत होते.

कोण आहेत सुनील देवधर
– 52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी
– 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर प्रचार व्यवस्थापक
– नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम केले.
– 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीत काम करताना देवधर यांच्या रणनितीमुळे भाजपाने 10 पैकी सात जागा जिंकल्या
-मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली
– आदिवासी मते भाजपाकडे वळवण्यासाठी आयपीएफटीसोबत आघाडी केली
– मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, असे यापुर्वीच जाहीर केले आहे.