थंडीचा कडाका वाढला : शेकोट्या पेटल्या

0

ग्रामीण भागासह शहरांतही थंडीची तीव्रता वाढली

चिंबळी : गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत असून, येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर शहरासह ग्रामीण भागातही थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तसेच किमान तापमानाचा पाराही खाली आला असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी, तसेच सकाळी खेडोपाड्यात शेकोट्या पेटत असल्याचे दिसते. इंद्रायणी नदी परिसरात येणारी पंचक्रोशीतील गावे, तसेच शहराच्या आसपासच्या भागातही थंडीची तीव्रता वाढली आहे.

साथीचे आजार वाढले
दरम्यान, थंडी पाठोपाठ आता विविध संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे. सर्व ताप थंडीची साथ पसरली असून, या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. रस्त्यावरील धूळ, तसेच चिलटांमुळे नागरिकांच्या डोळ्यांना सुज येत असून, डोळ्याच्या साथीने अनेक रुग्ण बेजार झाले असल्याची चर्चा आहे. शहरात डेंगीची साथ सुरू असून, सध्या थंडीने आजारी पडलेले रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसते.

मॉर्निंग वॉक वाढला
थंडीच्या दिवसात मोकळ्या हवेत फिरायला जाण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडत असून, मोकळा रस्ता, इंद्रायणीचे घाट, मंदिर परिसर व मोकळी मैदाने, बागा आता नागरिकांसाठी जॉगिंगची ठिकाणे झाली आहेत. थंडीमुळे त्वचा कोरडी पडत असल्यामुळे बॉडीलोशनला मागणी वाढली आहे. तर उबदारपणा ठेवण्यासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोज्यांना मागणी वाढली आहे.

शेकोटीभोवतीच्या गप्पा रंगल्या
नुकताच गुजरात निवडणुकीचा निकाल लागला असून, या अनुषंगाने शेकोटीभोवती जमलेले लोकांत राजकीय गप्पा रंगत असल्याचेही चित्र दिसत आहे. तशा अनेक विषयांवर चर्चेला ऊत येतो, मात्र सध्या निवडणूक आणि राजकारण याचीच चर्चा होत असल्याचे दिसते. काहीवेळा वादविवाद होत असले तरी खेळीमेळीचे वातावरण असते.