थंडीचा मुक्काम आणखी 3 दिवस!
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून थंडीचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शहरांतील किमान तापमानात घट होत आहे. रविवारी पुणे शहरातील किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा कमी असून येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
उष्ण लहरींची तीव्रता कमी
हिमालयाच्या जवळील काही राज्यात बर्फवृष्टी होत असून शीत लहरी निर्माण झाल्या आहेत. या शीत लहरी कोरड्या हवामानामुळे राज्यात येत आहेत. त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणार्या उष्ण लहरींची तीव्रता कमी झाली असल्यामुळे हवामानात गारवा आला आहे. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घटन झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
नाशिकरांना हुडहुडी
उत्तर भारतात आलेल्या शीतलहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. काश्मीर खोर्यात प्रचंड प्रमाणात थंडीची लाट पसरली असून, श्रीनगरमध्ये उणे 2.1 इतके किमान तपमान नोंदविले गेल्यामुळे उत्तर भारतही थंडीच्या कडाक्याने प्रभावित झाला आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे.
प्रमुख शहरातील किमान तापमान (अं. से.)
पुणे 10.6, जळगाव 10.2, कोल्हापूर 15.9, महाबळेश्वर 13.3, सातारा 11.4, रत्नागिरी 18.4, नांदेड 12 अकोला 10.4, अमरावती 12.6, गोंदिया 9.8, मालेगाव 10.2, नागपूर 9.8, सोलापूर 13, सांगली 13.7.