थकलेले भुजबळ तर कदमांची डॅशिंग एन्ट्री

0

मुंबई: पांढरा कुर्ता आणि पायजमा, पांढरीशुभ्र दाढी, पिकलेले केस, डोळ्यावर काळी फ्रेम असलेला चष्मा, अंगावर पांघरलेली शाल आणि थकलेल्या शरीरासह विधानभवन परिसरात एम्ब्यूलंसमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांचे साधारणतः 11.45 वाजता आगमन झाले. यावेळी पक्षातील ज्युनियर नेत्यांनी भावनिक होत त्यांचे स्वागत करत आधार दिला तर दुसरीकडे पोलीस गाडीतून आणलेले अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी आ. रमेश कदम यांनी मात्र डॅशिंग एन्ट्री घेत सर्वांनाच चकित केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही खल दिसून येत नव्हता. दोघांनाही पोलीस बंदीबस्तात विधानभवनात आणण्यात आले.

साहेबांना साथ देण्याची वेळ
शरद पवार साहेबांना साथ देत पक्षासाठी काम करण्याची वेळ असताना इथं अडकून पडलोय असे भुजबळ यांनी म्हटले असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी सांगितले. विधानभवनात मतदानावेळी भेटल्यानंतर पवार आणि भुजबळ यांच्यात संवाद झाला. तुम्ही सगळेजण जे काही करताय ते माध्यमांतून पाहून बरं वाटतं, मात्र प्रत्यक्षात काम करण्याची इच्छा असतानाही करू शकत नाही असेही भुजबळ म्हटल्याचे अजित पवार यांनी सांगितले.