थकित भाड्या मुळे दापोडी कार्यालय बंद

0
वितरण कार्यालय कासारवाडीला स्थलांतरीत 
खडकी : दापोडी येथिल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणीचे उपविभागीय कार्यालय कासारवाडी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. थकित भाड्यामुळे हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आल्याची चर्चा सध्या होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने भाडे तत्वावरील उप विभागीय कार्यालये स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे, यावेळी पिंपरी विद्युत वितरण कंपनी अधिकार्‍यांनी सांगितले. गणेश नगर येथिल गणपती मंदिरा शेजारील गणेश कॉर्नर इमारतीच्या तळमजल्यावर मागिल अनेकवर्षांपासुन उप विभागिय वितरण कार्यालय कार्यरत आहे. 25 जानेवारी पासुन हे वितरण कार्यालय कासारवाडी येथिल कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे, असा सुचना फलक वितरण कंपनीने लावला आहे. येथिल वितरण विभागात फुगेवाडी व दापोडी येथिल लाखो ग्राहक नोंदणीकृत आहेत. कार्यालय केवळ भाडे खर्चामुळे स्थलांतरीत केल्या बाबत येथिल नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अन्यथा आंदोलन करणार
नविन जोडणी, वाढीव विज बिल व इतर कामां संदर्भात तक्रारी करीता नागरीकांना पाच किलो मिटरचे अंतर कापावे लागणार आहे व त्याची आर्थिक झळ ही सोसावी लागणार आहे. त्यामुळे हे कार्यालय पुर्ववत दापोडी परिसरात सुरु केले जावे, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. ग्राहकवर्गाकडुन विविध कर आकाराअंतर्गत भरमसाठ विज बिल आकारले जात असताना वितरण कंपणीला भाडे तत्वावरील कार्यालये खर्चिक वाटत असल्याची टिका पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब मुगुटमल यांनी कंपनीचे वारिष्ठ अधिकारी शिवाजी वायफळकर यांच्या कडे केली आहे. वितरण कंपणीने तातडीने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी मुगुटमल यांनी दिला. पिंपरी वितरणचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी वायफळकर यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडुन भाडे तत्वारील उपविभागीय कार्यालये बंद करण्याचे आदेश आल्याने ही कारवाई केल्याचे सांगितले.