‘थम्ब’ करून टाईमपास करणार्‍या कर्मचार्‍यांना आसूड

0

पिंपरी-चिंचवड : घराजवळील महापालिकेच्या कार्यालयातील बायोमेट्रिक ‘थम्ब’ मशिनवर हजेरी लावून ‘टाईमपास’ करणार्‍या महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांवर आता महापालिका कारवाईचा आसूड ओढणार आहे. तसेच कार्यालयीन वेळेत खासगी काम करण्यासाठी बाहेर गेल्यास आणि महापालिकेचे वाहन खासगी कामासाठी वापरल्यास अधिकारी, कर्मचारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच दहा वाजून दहा मिनिटानंतर कार्यालयात आल्यास कर्मचार्‍याची गैरहजेरी लावली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहे.

कर्मचार्‍यांसह अधिकारीही कामचुकार
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी शिस्तीचे पालन करत नाहीत. बायोमेट्रिक थम्ब हजेरी लावून खासगी कामासाठी, कार्यक्रमांसाठी कार्यालय सोडून जातात. टाईमपास करतात. तसेच पालिकेच्या वाहनाचा वापर खासगी कामासाठी, कार्यक्रमांसाठी केला जात आहे. कार्यलयात सकाळी थम्ब करण्यास उशीर होऊ नये व उशिरा उपस्थितीची कारवाई होऊ नये या उद्देशाने काही अधिकारी, कर्मचारी स्वत:च्या सोईच्या दृष्टीने घराजवळील अथवा जाण्या-येण्याच्या मार्गावरील नजीकच्या कार्यालयातील थम्ब मशिनवर हजेरी लावतात. कार्यरत असलेल्या कार्यालयात उशिराने जात असल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले आहे.

शिस्त पालनाचे परिपत्रक
त्यामुळे कर्मचार्‍यांनी शिस्तीचे पालन करण्याबाबत आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. महापालिकेच्या शाखाप्रमुख, विभागप्रमुखांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थिती कामी विभागातील हजेरीपत्रकाची दैनंदिन सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी तपासणी करुन हजेरी पत्रकावर स्वाक्षरी नसलेल्या अधिकारी, कर्मचारी याच्या नावासमोर ‘लाल शाई’ने फुली मारावी. तसेच अधिकारी कर्मचार्‍यांनी नेमून दिलेल्या कार्यालयातील थम्ब मशिनवरच हजेरी लावावी. अन्य ठिकाणच्या थम्ब मशिनवर थम्ब केल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी. तसेच याबाबतचा मासिक अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी पाठविण्यात यावा. ज्या महिन्यात एकही कर्मचारी उशिराने आला नसल्यास त्या महिन्याचा तसा निरंक अहवाल सादर करावा लागणार आहे.

होणार शिस्तभंगाची कारवाई
बायोमेट्रिक थम्ब करुन हजेरी लावून कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाज न करता वैयक्तिक, खासगी कामासाठी, कार्यक्रमांसाठी कार्यालय सोडून जावू नये. तसेच महापालिकेच्या वाहनाचा वापर खासगी कामासाठी करु नये. तसे केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.