जळगाव । सरत्या वर्षांला निरोप देत जळगावकरांनी जल्लोषात नव्या वर्षांचे स्वागत केले. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘थर्टी फर्स्ट’आणि नववर्ष स्वागताचा जल्लोष टीपेला पोहोचला, पहाटेपर्यंत तो सुरूच होता. मध्यरात्री झालेल्या फटाक्यांच्या आतीषबाजीमुळे जळगाव शहर काळोख्या रात्रीही उजळून गेले होते. यावेळी विविध हॉटेल्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या थर्टीफस्टच्या कार्यक्रमांमध्ये तरूणाईने बॉलिवुड गितांवर ठेका धरत आनंद लुटला.
एकमेकांना दिल्या शुभेच्छा
रविवारी रात्री एकमेकांना शुभेच्छा देत, गळाभेट घेत जळगावकरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षांतील घडामोडींना उजाळा देत नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत केले. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजीही झाली. जल्लोषात तरुणाईचा उत्साह अधिक होता, तो हॉटेल्स आणि ढाब्यांवरून ओसंडून वाहात होता. या उत्साहाला आवर घालण्यासाठी पोलीस पथकेही सतर्क होती. अनेकांनी नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून नवीन उपक्रमांनाही सुरुवात केली. या जल्लोषातही अनेकांनी घरात बसून टीव्हीवरील कार्यक्रम पाहणेच पसंत केले.
व्यावसायिकांनी घेतला संधीचा लाभ
‘थर्टी फर्स्ट’ आणि जल्लोष हे समीकरण दरवर्षी दृढ होत चालले आहे. यात तरुणाई आघाडीवर होती. ‘थर्टी फर्स्ट’चे नियोजन गेल्या काही दिवसांपासून चालवले होते. त्याचे ‘एसएमएस’ परस्परांच्या मोबाइलमधून जात होते. मित्रमैत्रिणींचे ग्रुप जमवले जात होते. त्यामुळे काहीशा सुस्तावलेल्या बाजारपेठेलाही थोडीशी चालना मिळाली. व्यावसायिकांनीही या संधीचा लाभ उठवत वातावरणनिर्मितीस सुरुवात केली होती. सायंकाळनंतर शहरातील अनेक चौकांमध्ये सीडी, डीजे लावून नव्या वर्षांचे स्वागत करण्यात आले.
पोलिस बंदोबस्त
नववर्षाच्या स्वागताच्या हे वातावरण लक्षात घेऊन पोलीसही सतर्क झाले होते. सायंकाळनंतर बंदोबस्त व गस्तीतही वाढ करण्यात आली होती. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी खास पथके तयार केली गेली होती. वाहतूक पोलिसांनीही मद्यपी व धूमस्टाईल वाहनचालकांवर कारवाईसाठी पथके नियुक्त केली होती. सायंकाळनंतर जल्लोषास सुरुवात झाली. रात्रीनंतर तो वाढतच गेला. मध्यरात्री तर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून गेले. शहरातील अवघी तरुणाई रस्त्यावर जणू लोटली होती. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्रीच अनेक ठिकाणी नवीन वर्षांच्या शुभेच्छांचे फलक झळकले होते.