पुणे : २०१९ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहाटे पाचपर्यंत हॉटेल, बार व परमिटरूम व इतर आस्थापना सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नववर्षाचा आनंद घेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी रात्रभर सहा हजार पोलिस रस्त्यावर तैनात राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असून मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी एक जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व दारूविक्री सुरू राहणार आहे. तर, स्पीकरला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. पण, त्यासाठी त्यांना पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, सर्वजनिक ठिकाणी होणाऱ्या खासगी पार्ट्यांनादेखील स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
‘कोरेगाव भीमा’ पार्श्वभूमीवर शहरात ५५ बैठका
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त आहेच. पण, पुण्यामध्येही यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून विविध संघटनांसोबत शहरात ५५ बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच, गेल्या वर्षी तीन जानेवारीच्या बंदामध्ये जाळपोळ, रस्ता रोको, गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींसह इतर सर्व समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.