बंदी असलेल्या साहित्याची सर्रास विक्री : खरेदी न करण्याचे आवाहन
पुणे : थर्माकोल आणि प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर देखील सध्या शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये थर्माकोलच्या आरास, मंदिरे, मखर, प्लॅस्टिकचे हार, फुले, पाने आणि अन्य सजावटीच्या साहित्यांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. मात्र यावर आता महापालिका कारवाई करणार असून, अशा वस्तूंची खरेदी नागरिकांनी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी केले आहे.
प्लॅस्टिक आणि थर्माकोल दोन्ही घटक पर्यावरणासाठी घातक असून, यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर बंदी घातली. त्याविरोधात थर्माकोल बनविणारे काही व्यापारी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोलवरील बंदीही कायम ठेवली. त्यानंतर देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. वास्तविक, या बंदीबाबत संभ्रमावस्था असल्याने व्यापार्यांनी बंदी असलेल्या गोष्टी विक्रीसाठी आणल्या आहेत. परंतु या वस्तूंवरील बंदी कायम असल्याने त्यावर कारवाई केली जाणार आहे, असे मोळक यांनी स्पष्ट केले.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर
लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असतानाही बाजारात मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा या पिशव्यांच्या वापराला सुरूवात झाली आहे. व्यापार्यांनीही दडवून ठेवलेला माल बाहेर काढला आहे. सिग्नलला, रस्तोरस्ती वस्तू विक्री करणार्या लोकांकडेही गार्बेज बॅग्जसारख्या वस्तू दिसून येत आहेत. खरेच कारवाई होईल या भितीने प्लॅस्टिकच्या पिशव्या नागरिकांनीही वापरणे सोडून दिले होते. मात्र आता कारवाईच होत नसल्याने नागरिकांनीही सर्रास याचा वापर सुरू केल्याचे दिसून येते.