थलैवाचा गुगली…

0

रजनीकांत नेहमीच चर्चेचा विषय असतो. सध्या त्याच्या राजकारण प्रवेशाचा मुद्दा चर्चेत आला आहे. रजनी खरेच राजकारणात येणार का, हा लाखमोलाचा प्रश्‍न सध्या तामीळनाडूतील जनतेला आणि देशातील राजकारण्यांना पडला आहे. रजनी राजकारणात आलाच, तर स्वतःचा पक्ष काढणार का की, तो भारतीय जनता पक्षात जाणार, असे अनेक प्रश्‍न चर्चेत आहेत. त्यावरून तामीळ राजकारण सध्या चांगलंच रंगलंय. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टींना फार काही अर्थ असेल, असे मला वाटत नाही. रजनी राजकारणात उतरेल, अशी शक्यताही अगदीच धूसर आहे आणि रजनीनेच त्याचे एकप्रकारे संकेत दिले आहेत, तरीही रजनीच्या ताज्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

रजनीला फार मोठा फॅन फॉलोअर आहे. केवळ तामीळनाडूच नव्हे, तर जगभरात त्याचे चाहते आहेत. तामीळनाडूतील चाहत्यांशी तो त्याच्या पद्धतीने संवाद साधत असतो. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्याने असा संवाद साधला नव्हता, तरीही त्याचे चाहते मात्र त्याच्यावर नाराज नव्हते. दहा वर्षार्ंनंतर प्रथमच रजनीने आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रम जाहीर केला अन् तामीळनाडूभर उत्साहाची लाट पसरली. रजनी फॅन्स क्लबनी याचा रीतसर कार्यक्रम तयार केला.

रजनीचा हा संवाद हाही एक मासलेवाईक भाग असतो. प्रत्येक शहरातील अडीचशे ते तीनशे फॅन्सना बार कोडेड पास दिले जातात. मग ठरल्या दिवशी ठरल्या ठिकाणी रजनी पोहोचतो आणि फॅन्सबरोबर मुख्यत्वे फोटो काढून घेतो. असल्या कार्यक्रमात भाषणबाजी नसते. किंबहुना रजनी अशा मेळाव्यांतून फारच कमी बोलतो. तो जे काही मोजके बोलतो, ते व्यक्तिगत स्वरूपाचे किंवा चाहत्यांची ख्यालीखुशाली विचारण्याच्या स्वरूपाचे असते. त्यात राजकीय विषय तर नसतोच, असा चाहत्यांचा अनुभव आहे. असे असतानाही रजनीने चेन्नईतील चाहत्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत राजकीय वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रजनीचा गुगली आहे तो नेमका हाच आहे. रजनीने अचानकच राजकीय भाष्य का केले, हा खरा प्रश्‍न आहे.

तामीळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी पोकळी आहे. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष पोरका झाला असून, पक्षाची शकले उडत आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी हातात हात घ्यायचा विचार चालवला असला, तरी ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. शशिकला कधीच जयललितांचा पर्याय नव्हत्या आणि आता तर त्या राजकारणाच्या परिघावरूनही दूर फेकल्या गेल्या आहेत. करुणानिधींचा द्रमुक हा राज्यातील सर्वांत प्रबळ पक्ष असून, करुणानिधी सध्या केवळ नामधारी पक्षप्रमुख आहेत. अभिनेते विजयकांत यांचा डीएमडीके, माजी मंत्री डॉ. एल. रामदास यांचा पट्टली मक्कल काची, असे काही द्रविडी पक्ष आहेत. पण त्यांचा प्रभाव अगदीच मर्यादित आहे. गलितगात्र या संज्ञेतून काँग्रेस अद्याप बाहेर आलेली नाही आणि भाजपला फारसा जनाधार नाही. असा एकूण तामीळनाडूचा राजकीय पट आहे. अशा राजकीय पोकळीत रजनी तामीळनाडूच्या राजकारणात उतरले, असेच सर्वांना वाटते आहे. त्यातूनच मग तो स्वतःचा पक्ष काढणार, की एखाद्या पक्षात जाणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या चर्चांत तथ्य नाही, हेच पुढे दिसून येईल.

रजनीच्या राजकारण प्रवेशाची चर्चा आजची नाही. 1996 च्या सुमारासही तशी चर्चा घडवून आणली गेली होती. त्या निवडणुकीत रजनीने द्रमुकला पाठिंबा दिला होता आणि त्याचा सकारात्मक फायदा द्रमुकला झाला होता. परंतु, त्यावेळीही रजनी सक्रिय राजकारणात उतरला नव्हता. त्यावेळी जयललितांशी त्याचे बिनसले होते. जयललितांचा रजनीवर प्रचंड राग होता, पण पुढे त्यांनाही रजनीशी जुळवूनच घ्यावे लागले होते. पुढच्या निवडणुकांतही रजनीने आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून जयललिता आणि करुणानिधी व स्टॅलिन यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकले नव्हते. आत्ताही जयललितांच्या निधनानंतर आरकेपुरम विधानसभा पोटनिवडणुकीत रजनीचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. तथापि, रजनीने कोणालाच दाद लागू दिली नाही. मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे सांगत रजनीने त्याची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

असे असताना दोनच दिवसांपूर्वी त्याने पुन्हा एकदा राजकीय विधान का केले, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. रजनीने त्याचे उत्तर दिलेले नाही. परंतु, त्याच्या विधानांमागची पार्श्‍वभूमी आहे, ती ही. भाजपच्या नेत्यांशी व विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्याचे संबंध चांगले असल्याचे सांगितले जाते. त्यातच पैसे खाणार्‍यांना मी कधीच जवळ करणार नाही, असे रजनीने म्हटल्याने तो भाजपमध्ये जाणार असे मानले जाऊ लागले. पण हे मानणेही भंपकपणाचे आहे. रजनीने द्रमुकसह काही स्थानिक पक्षांना दिलेला हा इशारा आहे. भाजपमध्ये जाण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. तसेच भाजपच्या राज्य शाखेलाही तसे वाटत नाही. रजनीचा प्रभावच इतका आहे, की त्याला पक्षप्रवेश नाकारणे जितके कठीण आहे, तितकेच किंबहुना त्याहून अधिक त्याला रोखणे अवघड असेल, याची जाणीव तामीळनाडूतील सर्वच पक्ष आणि नेत्यांना आहे. रजनीने त्याच्या चाहत्यांशी चर्चा करण्याच्या बहाण्याने राजकारण प्रवेशाची चाचपणी केली का? स्वतःचा पक्ष काढण्याच्या हेतूने तर त्याने चाचपणी केली नसेल ना, अशाही शंका उपस्थित केल्या गेल्या. परंतु, त्याही निराधार आहेत. थलैवा रजनी असा आहे, की त्याला केवळ घोषणा पुरेशी आहे. बाकी पक्षाचे कॅडर असेही उभे राहू शकेल. त्यासाठी चाचपणीची गरज काय? पक्ष काढणे आणि तो चालवणे, हे काय दिव्य असते, याची त्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तो त्याही वाटेला जाण्याची शक्यता नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या 2.0 या नवा चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा निश्‍चित करण्याचे घाटत असतानाच रजनीने नव्या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतच्या करारपत्रांवरही त्याने सह्या केल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, की रजनी चित्रपटांतच राहणार आहे. राजकारण प्रवेश ही त्याच्यासाठी सध्याची प्राथमिकता नाही. राज्यातील राजकारणात आपल्या नावाचा गैरवापर कोणी करू नये, हा इशारा त्याला द्यायचा होता, तो त्याने दिला. थलैवाच्या गुगलीचा हा राजकीय अर्थ समजून घेतल्यास बाकी चर्चांना आपोआपच पूर्णविराम मिळेल.

गोपाळ जोशी – 9922421535