पुणे । येत्या वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात ‘इलेक्ट्रिक एसी’ बस दाखल होणार आहे. यामुळे अधिक आरामदायी आणि साध्या बसच्या तिकिट दरामध्ये हा प्रवास करता येणार आहे. तसेच 400 सीएनजी बस घेण्याचेही प्रस्तावित आहे. या बस पीएमपीच खरेदी करणार आहे. दोन्ही बसेसची निविदा प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाईल, अशी माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी 500 वातानुकूलित ‘ई बसेस’ला मान्यता दिली असून, या बसच्या निविदेप्रक्रियेची बैठक 9 मे रोजी होणार आहे. पुढील दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर दर महिन्याला किमान 50 बस मार्गावर येतील. या बस भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन असून सध्याच्या बसेसच्या तुलनेत त्यांचा दर कमी असेल. ई-बसेससाठी केवळ जागा दिली जाईल. तिथे चार्जिंग पॉईंट असतील. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच स्मार्ट सिटीकडून यासाठी अनुदान मिळू शकते. तसेच पायाभूत सुविधाही संबंधित कंपनीच करणार आहे. हा खर्च कमी झाल्याने बसेसचे तिकीट दर साध्या बसप्रमाणेच ठेवले जातील.
दरवर्षी 180 बस स्क्रॅप करणार
सध्या पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 93 बस आहेत. त्यातील 260 बस जुन्या असल्याने वर्षभरात स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. तसेच त्यापुढील वर्षभरात 180 बस स्क्रॅप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात जुन्या 440 बस कमी होतील. पुढील काही दिवसात 70 मिडी बस ताफ्यात येतील. त्याचवेळी टप्प्याटप्याने ई बस आणि सीएनजीच्या एकूण 900 बस मिळणार आहेत. पीएमपीची प्रवासी संख्या चार वर्षांत 20 लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट असून, आस्थापना आराखडा लवकरच तयार केला जाईल. खासदार निधीतून बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी 3 कोटी उपलब्ध असून, दैनंदिन पासचे दर 50 टक्क्यांनी कमी करणार आहे. नव्याने समाविष्ट 14 गावांचा वाहतूक नियोजन आराखडा तयार होणार असून, पीएमपीचे सर्व डेपो अत्याधुनिक करण्याचे नियोजन आहे. पार्किंगसाठी बोपोडी येथील जागा निश्चित केल्याचे शिरोळे म्हणाले.