थेट आरटीओकडे तक्रार केल्याने पीएमपी बसची योग्यता रद्द

0

पुणे : तुटलेले पत्रे, बंद पडलेले दिशादर्शक बल आणि खिळखिळ्या बसमधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक आरटीओने सोमवारी थांबवली. बसमधील एका प्रवाशाने थेट आरटीओकडे तक्रार केली होती. यानंतर आरटीओ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत बस मार्गावर चालवण्यासाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आल्याने तिचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून पीएमपीला दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.

पीएमपीकडून चालवण्यात येणार्‍या बसेसमधील अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. परिणामी, ब्रेकडाउनचे प्रमाणही जास्त आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने जुन्या बसेस मार्गावर आणल्या जातात. मात्र, अशा परिस्थितीत मार्गावर सोडण्यासाठी सक्षम नसलेल्या बसेसही बाहेर येत असल्याचे सोमवारी दिसून आले आहे.

बसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द

प्रवासादरम्यान पुणे स्टेशन येथील एका प्रवाशाने ही बाब समोर आणली. पुणे स्टेशन येथून निघलेली एमएच 12-डीटी5908 ही बस खिळखिळी असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशाने याची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली. याची दखल घेत आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक यांनी स्टेशन येथील डेपोत जाऊन या बसची तपासणी केली. यादरम्यान बसेस चालवण्याच्या स्थितीत नसल्याने तत्काळ योग्यता प्रमाणपत्र रद्द करून तिचे संचनल बंद केल्याची माहिती आरटीओ अधिकार्‍यांनी दिली. तसेच, पीएमपी प्रशासनाला नोटीस देऊन बस दुरूस्त करूनच मार्गावर आणण्याचे सांगण्यात आले आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

बसेस मार्गावर चालवण्यासाठी सक्षम असेल, तरच ती सोडण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना पीएमपी अध्यक्षांनी दिल्या आहेत. मात्र, तरीदेखील आगार व्यवस्थापकाने ही बस मार्गावर पाठविलीच कशी? असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

देखभाल दुरुस्ती विभाग?

पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या जास्त आहे. परिणामी, दुरूस्ती करावी लागण्याचे प्रमाण जास्त आहे. या बसेस दुरूस्तीची जबाबदारी देखभाल दुरुस्ती विभागाची आहे. मात्र, सद्यस्थिती रस्त्यावर अनेक बसेसच्या काचा फुटलेल्या असणे, नादुरुस्त दरवाजे, तुटलेले पत्रे, वायपर बंद असणे अशा अनेक समस्या आहे. यामुळे या विभागातील कर्मचारी, अधिकारी दुरुस्ती करतात, की नाही? तसेच, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असूनही देखभाल दुरुस्ती का होत नाही? असा सवाल प्रवाशांना पडला आहे.

संबंधित बसची दुरुस्ती करूनच मार्गावर

संबंधित बस ही पुणे स्टेशन डेपोची असून 23 जुलै 2019पर्यंत बसची फिटनेस वैधता आहे. मात्र, आरटीओकडून तपासणीदरम्यान काही तांत्रिक गोष्टींमध्ये कमतरता आढळून आल्याने बससचे संचलन थांबवण्यासंदर्भात ‘मेमो’ देण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधित बसची दुरुस्ती करून मार्गावर आणण्यात येईल, असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले.