सर्व सोयी एकाच छताखाली मिळणार
पिंपरी : थेरगाव मधील नागरिकांना शासकीय कामकाजा संदर्भात पायपीट करत पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये हेलपाटे घालावे लागत होते. मात्र त्यांची पायपीट टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी प्रभागातील नगरसेवकांनी एकमताने प्रभागात बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार पाठपुरावा करून थेरगावातील सर्व्हे नं 9 मध्ये आरक्षण क्रमांक 625 या ठिकाणी हा बहुउद्देशीय इमारत प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि.22 रोजी) होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नागरिकांना अत्याधुनिक व्यायामशाळा, पोलीस चौकी, अग्निशामक केंद्र, करसंकलन केंद्र, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. नागरिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे एकप्रकारची मिनी महापालिका असणार आहे.
कचरा संकलनाचे स्थलांतर करून या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. हा बहुउद्देशीय इमारत प्रकल्प 7 हजार 41 चौरस मीटर भूखंड क्षेत्रामध्ये साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये 1 हजार 112.33 चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारत उभारण्यात येणार आहे. या कामासाठी जगदाळे अँन्ड असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. तर एस.एस.साठे यांना या प्रकल्प बांधणीचे काम देण्यात आले आहे. या बहुउद्देशीय इमारत प्रकल्पामध्ये तळमजल्यावर पार्किंग असणार आहे. तसेच पोलीस चौकी, आरोग्य, जेष्ठ नागरिकांना एखत्रित येण्यासाठी विरंगुळा केंद्र, अग्निशामक केंद्र, परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन अत्याधुनिक व्यायामशाळेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाचन संस्कृतीत भर पडावी यासाठी वाचनालय उभारण्यात येणार आहे.
नागरिकांचा वेळ वाचणार
गटनेते आणि अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी सांगितले की, शासकीय कामासंदर्भात थेरगावातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत हेलपाटे घालावे लागत होते. त्यांचा वेळ वाया जात होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र चारही नगरसेवकांनी एकत्रित येऊन आपल्या प्रभागामध्ये बहुउद्देशीय इमारत प्रकल्प राबविण्याचा विचार केला. त्यानुसार फेब्रुवारी 2018 मध्ये स्थायी समितीने या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे. नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले की, या बहुउद्देशीय इमारत प्रकल्पामध्येच ग प्रभाग कार्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. याला लागून असलेल्या इमारतीमध्ये विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभागातील नागरिकांच्या गरजा ओळखून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.