हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळ्यांचा वापर नाही
पिंपरी : थेरगाव येथे महापालिकेचे तीन मजली रुग्णालयाचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. तिसर्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे साठ ते सत्तर मजूर येथे काम करतात. मात्र, त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शूज व इमारतीच्या बाजूला जाळ्या अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच मजुरांच्या राहण्याच्या खोल्याही इमारतीलगत असून कामगारांची लहान मुलेही परिसरात खेळत असतात. इमारतीच्या खांबाचे काम करताना कामगार असुरक्षितपणे फळीवर उभे राहून काम करतात.
सध्या बांधकाम मजुरांच्या अपघाती मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांधकाम मजुरांचा सुरक्षेच्या उपाय योजना नसल्याचे समोर आले आहे. महापालिका थेरगाव रुग्णालयाच्या बांधकाम साइटवरच मजुरांच्या जिवीताच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. कायद्यानुसार मजुरांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे. महापालिका मात्र, या कायद्याला पायदळी तुडवत आहे. इमारतीच्या बाजूला पाण्याच्या टाकीसाठी मोठा खड्डा खोदला असल्याने तेथेही सुरक्षेबाबत काळजी घेतलेली दिसत नाही. विशेष म्हणजे महापालिकेचे अभियंतेही बांधकामाची पाहणी करताना हेल्मेट वापर करत नाहीत. सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते.
दुर्घटना घडल्यास ठेकेदार जबाबदार
महापालिका स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता ओंबासे म्हणाले की, ईगल इफ्रा इंडिया लिमिटेडचे ठेकेदार थेरगाव रुग्णालयाचेही काम करत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबद्दल ठेकेदाराला पत्र देणार आहेत. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. तर कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले की, महापालिका आयुक्त व कामगार आयुक्त यांना याबाबत पत्र देणार आहे. एखादी घटना घडल्यावर महापालिका व कामगार विभाग मोठ्या उपाययोजना केल्यासारखे मोठी धावपळ करते. मात्र, अगोदरच मजुरांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतल्यास मजुरांना जीव गमवावा लागणार नाही.