वाकड : काही दिवसांच्या शांततेनंतर शहरात पुन्हा एकदा तोडफोड करून दहशत माजविण्याचे सत्र सुरू झाले आहे. थेरगावमध्ये शुक्रवारी रात्री एका टोळक्याने वाहन आणि घरांची तोडफोड करून दहशत माजविली. या दरम्यान एका तरुणावर वार करण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, त्या तरुणाने वार चुकवून तेथून पळ काढला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगावातील कैलासनगरात घडली. याप्रकरणी अजय भोसले, अतुल थोरात (दोघे रा. थेरगाव) यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल बाबर (वय 23, रा. थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार
फिर्यादी विशाल आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून, ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून भांडणे आहेत. किरकोळ कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. भांडणाच्या रागातून आरोपींनी शुक्रवारी रात्री आराडा-ओरडा करत हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन परिसरात प्रवेश केला. फिर्यादी विशाल याला शिवीगाळ करत दमदाटी केली. आरोपी अजय भोसले याने त्याच्या हातातील कोयत्याने विशाल याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विशालने नेम हुकवून तेथून पळ काढला. विशाल पळून गेल्यानंतर चिडलेल्या आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामध्ये टेम्पो, स्कॉर्पिओ कार, इंडिका कार आणि तीन दुचाकींचा तोडफोड केली. तसेच घरांचे दरवाजे, काचांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.