वाकड : ऑनलाईल लॉटरी सेंटरमधील सामानाची तलवारीने तोडफोड केल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचीदेखील नासधूस केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार थेरगाव येथील धनगर बाबा मंदिराशेजारी असलेल्या जे.के. ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये शुक्रवारी (दि. 7) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेट्या उर्फ गणेश ठाकूर आणि त्याच्या इतर सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास कांबळे (वय 27, रा. हिंजवडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टोळक्यांची परिसरात दहशत
विकास कांबळे हे त्यांचे इतर साथीदार अमोल, अजय आणि प्रवीण यांच्या मदतीने ऑनलाईन लॉटरी तिकिटे ग्राहकांना विकत होते. त्यावेळी शेट्या उर्फ गणेश आणि त्याच्या साथीदारांनी दुकानात प्रवेश केला. या टोळक्याने दुकानातील टी.व्ही., कुलर, संगणक तसेच तीन मोबाईल तसेच इतर साहित्याची तलवारीने तोडफोड केली. तसेच कांबळे आणि त्यांच्या साथीदारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. निघून जाताना दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचेवरही तलवारीने मारून काच फोडली. परिसरात दशहत निर्माण व्हावी, यासाठी आरडा-ओरडा करत आरोपी निघून गेले. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर विकास कांबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.