पिंपरी-चिंचवड : शहरात दोन ठिकाणी गाड्यांची पुन्हा तोडफोड करण्यात आली. दोन्हीही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडल्या असून सकाळी नागरिकांनी पाहिल्यानंतर उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही घटनेत मिळूण तब्बल 17 वाहने फोडण्यात आली आहे.
अशोका सोसायटी, मोरेश्वर कॉलनी परिसर
पहिल्या घटनेत थेरगाव येथील अशोका सोसायटी, आनंद हॉस्पिटल आणि मोरेश्वर कॉलनी या परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुचाकी, चारचाकी अशा सुमारे 10 ते 12 गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास घडली. वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराही तपासत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 टेम्पो ट्रॅव्हल, 2 मालवाहू टेम्पो, एक रिक्षा अन्य 5 प्रवासी वाहनांच्या काचा फोडल्या. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केली असल्याचे तपासात समजत आहे.
संत तुकाराम नगर, जिजाऊ भवन
तर दुस-या घटनेत पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केली. येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाजवळ असलेल्या 7 चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणार्या टोळक्याने ही तोडफोड केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
लवकरच लावला जाईल छडा
या घटनांमुळे मागील वर्षाप्रमाणेच नवीन वर्षातही गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचे काम सुरूच राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ वर्चस्व गाजविण्यासाठी अज्ञात टोळक्याकडून अशा दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा या परिसरात होती. पोलिसांनी याबाबत कोणताही अंदाज वर्तविलेला नाही. मात्र, लवकरच याचा छडा लावला जाईल, असे पोलिसांनी संतप्त नागरिकांना सांगितले.