थेरोळ्यात पट्टेवार वाघाची हत्याच : दोघा आरोपींना पुन्हा वनकोठडी

0

पाचव्या पसार आरोपीचा शोध सुरू : इलेक्ट्रीक शॉक लागल्यानेच वाघाचा मृत्यू

मुक्ताईनगर- थेरोळा गावाजवळील तापी नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू उसाच्या शेतात लावलेल्या इलेक्ट्रीक तारांचा शॉक लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली होती तर पाचव्या पसार आरोपीचा कसून शोध सुरू आहे. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली बैलजोडी व अन्य साहित्य वनविभागाने जप्त केले आहे. दरम्यान, अटकेतील चौघांपैकी दोघांना न्यायालयीन तर दोघांना 20 पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आल्याने त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण म्हणाले.

वाघाच्या हत्येनंतर शव टाकले नदीपात्रात
उसाच्या शेताता तारेचे कुंपण करून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आल्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता तर आरोपींनी हा मृतदेह बैलगाडीद्वारे नदीपात्रात आणून टाकला होता. वनविभागाने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर महादेव चग्गू बजरे (53), सोपान महादेव बजरे (28), अनिल साहेबराव बाठे (40) व कृष्णा चंद्रभान बजरे (रा.थेरोळा, ता.मुक्ताईनगर) यांना अटक केली होती तर सुरुवातीला चौघांना 18 पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता महादेव व सोपान बजरे यांना 20 पर्यंत वनकोठडी तर उर्वरीत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील पाचवा आरोपी प्रकाश महादेव बजरे हा पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. वनविभागाने वनकोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले बैल, दुशेर व दोर थेरोळा येथील घरातून काढून दिले आहेत.

नॉयलॉन दोरी ठरला महत्त्वाचा पुरावा
पूर्णा नदीपात्रात वाघाचा मृतदेह फेकून देण्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाभोवती नॉयलॉन दोरी आढळली होती तर ही दोरी वनविभागाच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरली. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या आरोपींच्या शेतात वाघाचा मृतदेह ओढल्याचा खुणा तसेच केस आढळल्याने आरोपींवर संशय बळावला होता व नंतर तो तपासात खरादेखील ठरला. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून उसाच्या शेतालगतच्या अन्य शेतकर्‍यांना नोटीसादेखील बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
उपवनसंरक्षक दिगंबर पवार, चाळीसगावचे वनक्षेत्रपाल संजय मोरे, जळगाव गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल धनंजय पवार, वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल प्रकाश वराडे, जामनेर वनक्षेत्रपाल समाधान पाटील, पाचोरा वनक्षेत्रपाल ज्ञानेश्‍वर देसाई, चारठाणा वनक्षेत्रपाल पी.पी.शेजुळे, कुर्‍हा वनपाल ए.जी.पाटील, डोलारखेडा वनपाल पी.पी.पाटील, राजुरा वनरक्षक के.एम.बडुरे, जळगाव गस्तीपथकाचे वनपाल आर.एच.ठाकरे, जळगाव गस्तीपथकाचे वनरक्षक सुनील पवार आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.