बुलडाणा – राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने अकोल्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अकोल्यावरून त्यांच्या खामगाव येथील निवासस्थानी नेण्यात आले. आज सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रांगणात भाऊसाहेबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत.
अशी असणार अंत्ययात्रा
फुंडकर यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन निघुन भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगांव नाका, शेगांव रोडने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी खामगांव यांच्याकडून देण्यात आली आहे.
खामगाव येथे फुंडकर यांचे पुत्र आ. आकाश फुंडकर, सुनिताताई फुंडकर, मुलगी वसुंधरा चोपडे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच भाऊसाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.