दंगलखोरांकडूनच 6 कोटींच्यावर दंगलीतील नुकसान भरपाईचा प्रस्ताव

0

जळगाव- जिल्ह्यातील रावेर शहराला दंगलींची पार्श्‍वभूमि आहे. येथील वारंवारंच्या दंगलीच्या घटनांमध्ये निष्पाप नागरिक तसेच पोलीस दलासह शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दंगलखोरांना शिक्षा होवून ही नुकसान भरपाई वसूल होत नाही. त्यामुळे या वारंवारंच्या दंगलीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी रावेर शहरात अशांतता क्षेत्र घोषित करावे, तसेच 22 मार्च रोजी झालेल्य दंगलीच्या घटनेती 6 कोटी 20 लाखांची नुकसान भरपाई संबंधित गुन्हयातील आरोपींकडून वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. प्रस्तावावर कारवाईचे जिल्हाधिकारी यांनाच अधिकार असून जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यास, संपूर्ण राज्यात जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा, याबाबतही पोलीस दलाकडून पोलीस महासंचालकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी मंगळवारी दिली. दरम्यान अशाप्रकारे दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणारा जळगाव जिल्हा हा मुंबईनंतर राज्यात दुसर्‍या क्रमांकांचा जिल्हा असेल, असेही म्हटले जात आहे.

दंगलीच्या घटनेत तीनशेहून अधिक आरोपी
22 मार्च रोजी रावेर शहरात दंगलीची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांचे वाहनाची जाळपोळ, तसेच एक घर पेटवून देण्यात आले होते. यात यशवंत काशिनाथ मराठे या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रावेर शहरात सात विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पूर्वनियोजितपणे नागरिकांनी घरावर दगड तसे वीटा जमा करुन ठेवले होते व त्याचा दंगलीच वापर केला होता. 7 गुन्ह्यांमध्ये 377 जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यात पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिवसरात्र मेहनत घेत आतापर्यंत 157 आरोपींना अटक केली आहे. रावेरच्या दंगलीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशयितांना अटक होण्याची ही पहिलीची घटना आहे.

रावेरातील या परिसरांना अशांत घोषित करावे
रावेर शहरात यापूर्वीही नागझिरी, रसलपूर नाका, लेंडी पुरा, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजी नगर, बंडू चौक, खाटीक वाडा, मन्यारवाडा या भागात दंगली घडलेल्या आहेत. निमझरी, रसलपूर नाका, लेंडी पुरा, कोतवाल वाडा, चावडी चौक, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजी नगर, इमामवाडा, पंचशिल चौक, बंडू चौक, खाटीकवाडा, मन्यारवाडा, गांधी चौक, हातेशा मशीद, थळा भाग, पाराचा गणपती, महात्मा फुले चौक, आठवडे बाजार या भागांमध्येच गेल्या काही वर्षांमध्ये दंगलीच्या घटना घडत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 51 (1) (अ) (ब) नुसार वारंवार दंगली घडणार्‍या संबंधित रावेरातील भागांना अशांत अघोषित करण्यात यावे व नुकसान भरपाई वसूल करावी, अशा पध्दतीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सदरचे स्थावर व मालमत्तेच नुकसान जर दंगल करणार्‍या आरोपींकडून भरपाई केली तर लोकांचे संबंधितांचे जातीय दंगलीत सहभाग होण्याचे प्रमाण कमी होईल, असेही प्रस्तावात नमूद आहे.

पोलीस अधीक्षकांसह अधिकार्‍यांची मेहनत
मुंबई येथील गेल्या काही वर्षापूर्वीच्या घटनेचा संदर्भ घेत मुंबई पोलीस पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 51 (3) प्रमाणे दंगलीच्या घटनेत संशयितांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी अभ्यास केला. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुचनांनुसार भाग्यश्री नवटके, पोलीस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरिक्षक बापू रोहम, पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी प्रस्ताव तयार केला आहे.

6 कोटी 20 लाख 91 हजार वसूल करावी
22 मार्च रोजी या दंगलीत दंगलग्रस्तांन स्थानिक नागरिकांची जाळपोळ केल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच या घटनेमुळे जळगाव जिल्ह्याचा पोलीस दलाच्या बंदोबस्तां 6 कोटी 14 लाख 92 हजार 059 असा खर्च झाला होता. तसेच स्थानिक नागरिकांचे मालमत्तेची जाळपोळ, यासह तोडफोड, जीवीतहानी याप्रमाणे पंचनामे करण्यात आले. त्यात 5 लाख 21 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर नगरपालिकेसह तसेच व्यवस्थापनाचा असे एकूण 77 हजार रुपये खर्च झाले होते. तर महावितरण कंपनीचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले होते. असे एकूण 6 कोटी 20 लाख रुपये 91 हजार रुपयांचा खर्चाचा बोझा या दंगलीतील दंगलग्रस्तांमुळे शासनावर पडला होता. त्यानुसारी संबंधित सर्व रक्कम दंगलीत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींकडून वसूल करण्याबाबतचा प्रस्तावात नमूद आहे.