दंगलप्रकरणी आरोपींची धरपकड सुरू!

0

शिक्रापूर । कोरेगाव भिमा ता. शिरूर येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगल प्रकरणी आम्ही सर्व ग्रामस्थ पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही कोरेगाव भिमाच्या सर्व ग्रामस्थांनी पोलीसांना दिली आहे. कोरेगाव भिमा ता. शिरूर दंगल प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्रीपासून अचानकपणे मिळत असलेल्या माहितीनुसार आरोपींची धरपकड सुरु केली आहे. यामुळे कोरेगाव भिमा व सणसवाडी येथे भितीचे वातावरण पसरले आहे. तर कोरेगाव भिमा व सणसवाडी परिसरामध्ये अनेकांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी चर्चा व अफवांचे पेव आले आहे. विनाकारण एखाद्या निरपराध नागरिकाचे नाव त्या गुन्ह्यात गोवले जाण्याची भीती ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

नागरिकांची पोलिसांकडे मागणी
मात्र याबाबत कोरेगाव भिमाच्या ग्रामस्थांनी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, दौंडचे उपविभागीय पोलिस आधिकारी गणेश मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली. या बैठकीत गावातील काही प्रमुख व्यक्तींनी आम्ही चौकशी प्रकरणी पोलीसांना संपुर्ण सहकार्य करु असे सांगितले. निरपराध स्थानिक नागरीकांना यात गोवण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील ग्रामस्थांनी केली.

काळजी नको
डॉ. संदीप पखाले म्हणाले, प्रमुख गावकर्‍यांनी एक समिती नेमावी. पोलिस त्यांना दंगलीत सहभागी असणार्‍या आरोपींची नावे सांगतील. त्या आरोपींना या समितीने पोलीसांच्या ताब्यात द्यावे म्हणजे गावात घबराटीचे वातावरण रहाणार नाही. तसेच आरोपींचा पूर्ण सहभाग निश्‍चित झाल्यावर त्यांना अटक होणार आहे. यामुळे विणाकारण निरपराध भरडले जाणार नाहीत, याची काळजी पोलिस घेत आहेत. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, माजी सरपंच अनिल कोल्हे, विक्रम दौंडकर, विजय गव्हाणे, रामदास गव्हाणे, दत्तात्रय ढेरेंगे, संदीप ढेरंगे, केशव फडतरे, सुनिल सव्वाशे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.