सणसवाडी । कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी दरम्यान मोठी दंगल उसळली असताना सायंकाळी राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आल्यावर सणसवाडी, कोरेगाव मधील वातावरण शांत झाले होते. मात्र मंगळवारी सकाळी कोरेगाव व सणसवाडी येथे ग्रामस्थ पुन्हा एकत्र येऊन निषेध नोंदवून शांतता राखण्याचे आवाहन करत होते. सणसवाडी येथे कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी भेट दिली. सणसवाडी चौकात नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी शांततेचे आवाहन करण्यात आले. दंगलीत मृत्यू पडलेल्या तरुणाचा मृत्यूस जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. दरम्यान, या दंगलीत सर्वसामान्य नागरिकांचे, व्यापार्यांचे सुमारे 15 कोटींचे नुकसान झाले आहे. समाजकंटक नुकसान करून पळून गेले. आता आम्हाला नुकसान भरपाई कोण देणार, असा सवाल करण्यात येत आहे. अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
भीमा-कोरेगावमध्ये सुमारे 11 कोटींचे नुकसान
कोरेगाव भीमातील छत्रपती ऑटोचे मोठे नुकसान समाजकंटकांनी केले. सत्यनारायण कापड, हॉटेल जनता पॅलेस, यशराज दूध डेअरीचे टेम्पो जाळण्यात आले. न्यू ताज ऑटो गेरेजमधील 16 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. कोरेगाव-भीमात जवळपास नुकसानीचा आकडा सुमारे 11 कोटीच्या पुढ आकडा असल्याचे नागरिक सांगत आहेत. या प्रकरणाबाबत गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी घटनास्थळी गावांची पाहणी केली. शिक्रापुर पोलीस पोलीस स्टेशन मध्ये चर्च्या केली यावेळी शिरूर हवेली आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. कोरेगाव भीमात सकाळी नागरिकांनी संपूर्ण गावात फेरी मारून गाव बंदचे आवाहन केले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किरकोळ प्रकार वगळता गावात शांतता होती. सणसवाडी येथे गावात संचारबंदी सारखी परिस्थिती होती. यावेळी सुरक्षादल व पोलीस यांना ग्रामस्थांच्या वतीने जेवण देण्यात आले. सणसवाडीत आजही कडकडीत बंद होता. सणसवाडी, कोरेगाव, वढू आदी भागातील अनेक कंपन्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. सणसवाडीत अनेक कामगार कामावर न गेल्याने कंपनीमध्ये मनुष्यबळ कमी पडले. तसेच अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. सणसवाडी व कोरेगावमधील दवाखाने वगळता सर्व बंद होते.
पुणे-नगर रस्त्यावर कडकडीत बंद
शिक्रापूर । सोमवारी झालेल्या गोंधळानंतर पुणे-नगर रस्त्यावर मंगळवारी जनजीवन काही अंशी सुरळीत झाल्याचे दिसले. मात्र बर्याच ठिकाणी बंद दिसून आला. कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर व कोंढापुरी या ठिकाणी झालेल्या दगडफेक व जाळपोळीमुळे पुणे नगर महामार्गावरील असणार्या गावांनी कडकडीत बंद पाळला होता. सोमवारी, मंगळवारी दिवसभर या गावांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. तसेच या महामार्गावर वाहनांची संख्याही तुरळकच होती. स्थानिक नागरिकांनी घराबाहेर न येणे पसंत केल्यामुळे पुणे-नगर रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
अजूनही रस्त्यावरच विजेच्या तारा
या दंगलीमधून विजेचे खांबही सुटले नाहीत. ठिकठिकाणी विजेचे खांब वाकवण्याचे प्रकार घडले. त्यामुळे विजेच्या तारा मंगळवारी म्हणजेच दंगलीच्या दुसर्या दिवशीही रस्त्यावर लोंबकळत होत्या. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समाजकंटकांनी पुणे-नगर रोडवरील बगीचा हॉटेलजवळील महापुरुषांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यालाही आग लावून या दुकानात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे नुकसान केले होते.
हिंसाचारात एकाचा मृत्यू
पुणे । कोरेगाव भीमाच्या विजयीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात सोमवारी दोन गटांमध्ये उफाळेलेल्या हिंसाचारात एका 30 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचे नाव राहुल फटांगळे असून तो सणसवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी विविध संस्था-संघटनांनी सोमवारी अलोट गर्दी केली होती. या कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत जखमी होऊन 30 वर्षांच्या राहुलचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शिक्रापूर पोलिसांनी ही माहिती दिली.
इंटरनेट, मोबाईल सेवा बंद
पुणे जिल्ह्यातील सणसवाडी, शिक्रापूर, भीमा-कोरेगाव येथे सोमवारी रात्री आणि मंगळवारीपासून इंटरनेट व मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली होती. काही काळापुरती ही सेवा सुरू करून ती पुन्हा बंद करण्यात येत असल्याने अनेकांना मनस्ताप भोगावा लागला. दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा समाजकंटकांकडून पसरवल्या जात असल्याने शासनाच्या सुचनेनुसार ही सेवा बंद करण्यात येत होती.
बारामतीमध्ये एसटी बस फोडली
बारामती । येथील बस आगारातील बसच्या काचा फोडल्यामुळे बारामती आगारात एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती अशी की, बारामती बस आगाराची बारामती-पुणे-बारामती ही विनावाहक विनाथांबा बस आगाराबाहेर पडली. यानंतर या बसची समोरची काच फोडण्यात आली. यामुळे घाबरलेल्या बसवाहक, चालकांनी बस न सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर बारामती शहर पोलिस स्टेशनला तातडीने घटनेची माहिती देण्यात आली. व आज्ञाताविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला. जवळपास एक तास या घटनेने स्थानकात गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संपूर्ण बसस्थानकाचा आढावा घेऊन परिस्थितीची माहिती केली. दरम्यान, बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांनी पोलिसांसह चालक, वाहकांशी चर्चा करून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आगारातून बस बाहेर पडण्यास सुरूवात झाली. बाहेरून येणार्या बसेस काही काळ आगारातच थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस सुटणार की नाही या साशंकतेने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र आगार अधिकार्यांनी तसेच पोलिसांनी वातावरण शांत करून संरक्षण देण्याच्या निर्णयामुळे बस बसस्थानकामधून सुटण्यास सुरूवात झाली.
सणसवाडीत 4 कोटींचे नुकसान
सणसवाडी येथे सोमवारच्या दंगलीत राहुल बाबाजी फटांगडे (वय 30, रा. सणसवाडी) याचा मृत्यू झाला होता. राहुल याच्यावर मुळगाव कान्हूर मसाई ता. शिरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दंगलीत सणसवाडीतील 12 दुकानांचे मोठे नुकसान झाले. यात चंदनगिरी मंदिर निर्माण या दुकानातील छोटी मंदिरे फोडून टाकली. भैरवनाथ ऑटो दुकानातील 5 तीनचाकी गाड्या जळून टाकल्या होत्या. तसेच रद्दी दुकान पेटवले होते. श्रीराम मिसळ दुकानाची तोडफोड तर अयोध्या मिसळ दुकान समाजकंटकांनी जाळले होते. स्वादश्री हॉटेलमध्ये तोडफोड करून जवळ चार लाख रुपयांचे नुकसान केले. विश्वकर्मा गॅरेजमधील चारचाकी चार गाड्या जाळण्यात आल्या. रज्जाकभाई गॅरेजमधील दोन ट्रक जमावाने जाळले. यात 15 लाख रूपयांचे नुकसान झाले. सर्वेश ऑटोमधील तीन दुचाकी जाळल्या तसेच टायर दुकानातील कॉम्प्रेसर व नवीन टायर जाळले. सणसवाडीत नुकसानीचा आकडा जवळपास 4 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.