दंडाची रक्कम न भरणार्‍या वाहनांचा होणार लिलाव

0

यावल तहसीलदारांच्या आदेशाने मंडळाधिकार्‍यांसह तलाठ्यांनी केली होती कारवाई ; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

यावल- महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणाहून अनधिकृतपणे गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या दोन ट्रक आणी तीन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केल्या. पकडण्यात आलेल्या वाहनमालकांना दंड भरण्याची मुदत नोटीसीव्दारे पाठविण्यात आली. मुदत संपल्यावर या वाहनांचा गौण खनिजासह लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

तालुक्यात झाली ठिकठिकाणी कारवाई
या संदर्भात तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल महसूल प्रशासनाच्या वाळू माफीयांविरूद्ध धडक मोहिम राबवली जात आहे. यावल तालुक्यातुन विविध ठिकाणाहुन मंडळधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक करणारे सुपडू रमेश सोळंके (कोळन्हावी) यांच्या मालकीचे वाहन तीन ब्रास गौण खनिजाची वाहतूक करताना बामणोद मंडळधिकारी यांनी चितोडा फाट्यावर 20 नोव्हेंबर रोजी पकडले होते. त्यांना दोन लाख 68 हजार 224 इतकी दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली तसेच 29 नोव्हेंबर 2018 रोजी शांताराम राजाराम धनगर (रा.बोरावल) यांच्या मालकीचे वाहन (एम.एच.19 बीजी 2693) हे वाहन ताब्यात घेवुन एक लाख 22 हजार 741 रुपये भरण्याची नोटीस पाठविण्यात आली. 7 सप्टेंबर 2018 रोजी शिवलाल भागवत कोळी (रा.पिंप्री, ता. यावल) यांच्या मालकीचे वाहन (एम.एच.28 डी.3846) या वाहन चालकास एक लाख 22 हजार 741 रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली. 5 एप्रिल 2019 रोजी ज्ञानेश्वर नामदेव तायडे (रा. कोळन्हावी) यांचे वाहन (एम.एच.49 झेड 4749) यास परसाडे शिवारात सुमारे दोन ब्रास वाळू वाहतूक करतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना दोन लाख 45 हजार 493 रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 27 एप्रिल 2019 रोजी मंडळाधिकारी व तलाठी यांच्या पथकाने न्हावी प्रगणे, अडावद या परीसरातून बाळु दगडु तडवी ( हिंगोणा) यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक एम.एच. 19-6267) जप्त केले. त्यांना दंडाची एक लाख तीन हजार 330 इतकी रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली होती.

दंडाची रक्कम न भरल्यास वाहनांचा होणार लिलाव
या सर्व वाहनमालकांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा अवधी संपला असून त्यांनी सात दिवसाच्या आत आकारण्यात आलेली दंडांची रक्कम न भरल्यास महसुल प्रशासन च्या वतीने दंडाची रक्कम वसुली करीता वाळु सह वाहनांचा देखील लिलाव करणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली.