जोहान्सबर्ग । ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने तब्बल 492 धावांनी जिंकला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे. धावांच्या हिशोबाने दक्षिण आफ्रिकेचा हा सगळ्यात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा पराभव आहे. 48 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 3-1ने विजय मिळवला आहे. वर्नन फिलँडरने 21 धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यामध्ये फिलँडरनं कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्कलचा हा शेवटचा कसोटी सामना होता. त्याने शेवटच्या डावामध्ये 2 विकेट घेतल्या. दुसर्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोघा फलंदाजांनाच दोन आकडी धावा करता आल्या. जो बर्न्सने 42 तर पीटर हॅण्ड्सकॉम्बने 24 धावा केल्या. पाचव्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 88/3 अशी केली होती, पण त्यांना फक्त 16.4 षटके खेळता आले. 612 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 119 धावांवर बाद झाला. या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये दक्षिण आफ्रिकेची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये सलामीवीर एडन मार्करमने 152 धावांची खेळी केली, तर दुसर्या डावामध्ये कॅप्टन फॅप डुप्लेसिसने 120 धावा केल्या.
वादात अडकली संपूर्ण मालिका
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधली ही मालिका पहिल्यापासूनच वादात अडकली. पहिल्या कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डीकॉक एकमेकांना भिडले. पॅव्हेलियनमध्ये जात असतानाची ही दृष्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, तर तिसर्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आणि कॅमरून बँक्रॉफ्टचे 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही कारवाई केली.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा जोहान्सबर्ग कसोटी सामना मॉर्केलच्या कारकिर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 492 धावांनी मात करत मॉर्केलला विजयी निरोप दिला. मॉर्केलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या केपटाऊनच्या तिसर्या कसोटीत एक मोठा विक्रमही केला. त्याने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा मॉर्केलची कसोटीतील पहिली विकेट होती. मॉर्केलने आजवरच्या कारकीर्दीत 86 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 44 ट्वेन्टी ट्वेन्टी सामंन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. 288 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्केलच्या नावावर 544 विकेट्स जमा आहेत. कसोटीत 306, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 188 आणि टी-20 मध्ये त्याने 47 फलंदाजांना माघारी धाडले. या कसोटी मालिकेपूर्वीच मॉर्केलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. मी आत्ताच कौटुंबिक आयुष्याला सुरुवात केली आहे. माझी पत्नीही दुसर्या देशात आहे. आमचे सध्याचे शेड्युल पाहता कुटुंबासाठी वेळ काढणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे,असे मॉर्केल म्हणाला होता. मी दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. त्यामुळे माझे सहकारी, क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि कुटुंबीयांसाठी नेहमी हजर असेल. माझ्यामध्ये अजूनही बरेच क्रिकेट बाकी आहे,असे तो म्हणाला होता. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये मॉर्ने मॉर्केल खेळताना दिसणार नाही. कारण, या लिलावात त्याच्यावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती.