दक्षिण मुख्यालयही करणार पेपरफुटीची चौकशी

0

पुणे: सैन्यदलात भरतीसाठीचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाची चौकसी राज्यातील पोलिस दलाने सुरू केली असतानाच लष्कराच्या दक्षिण मुख्यालयही या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करणार अशल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

लष्कराचे दक्षिण मुख्यालय पुण्यात आहे. त्यामुळेही दक्षिण मुख्यालयाने ही बाब गांभिर्याने घेतल्याचे सांगण्यात येते. ट्रेडसमन, जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क अशा पदांसाठी रविवारी होणार्‍या परीक्षेचे पेपर, राज्यात ठाणे, पुणे, नागपूर आदी ठिकाणी होणार होते. हे पेपर फुटल्याचे समजल्याने ठाणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही जणांना अटक केली. पुणे, नागपूरमध्येही तातडीने अशीच कारवाई केली गेली. परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ठाणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, यात आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सैन्य दलातील भरतीचे पेपर फोडण्यात लष्करातीलच काही आजी- माजी अधिकार्‍यांचा हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यानेही लष्करी यंत्रणेतही याबाबत तीव्र नराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे पेपर कसे फुटले, ते कोणामार्फत बाहेर गेले, याच्या मुळाशी कोण आहे, आदी बाबींचा तपास आता दक्षिण मुख्यालयही करणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.