दगडखाण कामगारांचा घरासाठी एल्गार

0

येरवडा । वाघोली येथील गायरान जमिनीवर दगडखाण कामगारांनी केलेली अतिक्रमणे नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी हवेली तहसीलदारांना ले-आउट तयार करण्यास दिलेल्या निर्देशानुसार जाणीवपूर्वक केलेला विलंब तसेच जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णय व ग्रामविकास अधिकार्‍याने दगडखाण कामगारांच्या घरांना दिलेल्या नोटिस यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडखाण कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

निवडणुकीवर बहिष्कार
आंदोलन दरम्यान सरकार व शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना संतुलन संस्थेचे बस्तू रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली दगडखाण परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आंदोलन दरम्यान कामगारांनी कपडे काढून शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा निषेध केला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती रेगे यांनी दिली. जनता संघर्ष दलाचे संस्थापक फिरोज मुल्ला यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

सुविधांबरोबरच हक्काचे घर
वाघोली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दगडखाणीवर राज्यासह परराज्यातील भूमिहीन, बेघर व कष्टकरी दगडखाण कामगार काम करत आहेत. मात्र अशा कामगारांना दगडखाणी व्यतिरिक्त काहीच माहीत नसल्याने हे कामगार शासनाकडून पुरविण्यात येणार्‍या अनेक सुविधांपासून वंचित राहत होते. मात्र त्यांना हक्काच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अ‍ॅड. बस्तू रेगे व अ‍ॅड. पल्लवी रेगे यांच्या पुढाकाराने संतुलन संस्थेची स्थापना करून अशा कामगारांना शासनाच्या असणार्‍या विविध सुविधांबरोबरच हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून व ग्रामसभेत ठराव मंजूर करून वाघोलीतील गायरान जमिनीवर झोपड्या उभारण्याची परवानगी मिळवली होती.

पाषाणशाळा देखील होणार उद्ध्वस्त
याबरोबरच गायरान जमिनीवर अतिक्रमणे केलेली घरे नियमित करण्यासाठी 14 एप्रिल, 2015साली जिल्हाधिकारी यांनी हवेली तहसीलदारांना असलेल्या गायरान जागेचा ले-आउट काढण्याचे आदेश दिले होते. पण तहसीलदारांनी संबंधित ले-आउट काढण्यास केलेल्या विलंबामुळेच काही आठवड्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी गायरान जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर येणार आहेत; तसेच दगडखाणीतील मुलांच्या शिक्षणासाठी संतुलन संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या पाषाणशाळा देखील उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे पालकमंत्र्याच्या अन्यायकारक निर्णय व ग्रामविकास अधिकार्‍याने पाठविलेल्या नोटिसांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

घटनेची शहानिशा करावी
गायरान जमिनीवर अतिक्रमणे करून झोपड्या उभारून जे नागरिक राहत आहेत. ते कोणी बलाढ्य नसून ते भूमिहीन, बेघर व कष्टकरी दगडखाण कामगार आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध सुविधांबरोबरच अशा कामगारांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. यामुळे घेण्यात आलेला निर्णय चुकीचा असून शासनाने या घटनेची शहानिशा करणे गरजेचे आहे.
– अ‍ॅड. बस्तू रेगे, संस्थापक अध्यक्ष, संतुलन संस्था

षडयंत्राचा निषेध
कष्टकरी कामगारांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरविण्याचे जे षडयंत्र या सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे सध्याचे सरकार हे गेंड्यांच्या कातड्याचे सरकार असून त्याला जाग येण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
– फिरोज मुल्ला
संस्थापक, जनता संघर्ष दल