दगडफेक करणार्‍या काश्मिरी युवकांविरोधात आता डोवाल नीती

0

नवी दिल्ली। काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या युवकांविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिले आहेत. रविवारी राजधानीत नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित राहणार आहेत. या बैठकी दरम्यान मेहबुबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणार्‍या चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या काश्मिरी युवकांबाबतच्या धोरणासंदर्भात त्यांना कल्पना देण्यात येणार आहे.

काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांवर होत असलेल्या दगडफेकीच्या विरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशा परिस्थितीत काश्मिरी युवकांप्रती सरकार नरमाई स्वीकारेल, अशी अपेक्षा राज्य सरकारने बाळगू नये, अशी स्पष्ट कल्पना मेहबुबा यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार डोवाल नीती वापरणार असल्याचडे स्पष्ट होत आहे. अजित डोवाल यांनी सांगितले की, या संदर्भात जास्त प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. दगडफेक करणारे जास्त दिवस टिकू शकणार नाहीत, हे दिवसही निघून जातील. काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाचे समाधान करण्याचे किंवा त्यांना खुश करण्याचे धोरण लागू पडणार नाही, हे डोवाल यांचे स्पष्ट मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार्‍या चर्चेदरम्यान अनेक वेळा डोवाल यांनी हा मुद्दा बोलून दाखवला आहे. दगडफेक करणार्‍यांना माफी मिळणार नाही, याची स्पष्ट कल्पना केंद्र सरकारने राज्य सरकारला द्यावी, अशी सूचना डोवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे. राज्यातील आघाडीच्या शासनात उपस्थित झालेल्या मुद्दांवर चर्चा करायला भाजप तयार आहे. पण, दगडफेक करणार्‍या युवकांविरोधातील संभाव्य कारवाईबाबत ते मागे हटायला तयार नाहीत. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्याचे केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. पण, ते आडमुठे धोरण सोडण्यास तयार नाहीत. राज्य सरकारने फुटीरवादी नेत्यांशी चर्चा केली तरी चालेल, हे केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

अजित डोवाल यांचे निरीक्षण
देश स्वतंत्र झाल्यापासून कोणाला तरी खुश करण्याच्या धोरणामुळे काश्मीरमधील परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. उलट त्यामुळे राज्यातल्या समस्या वाढल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघाची प्रतिक्रिया काय असेल? याचा विचार न करता पाकिस्तानकडून आलेल्या शक्तीचे उच्चाटन करण्यावर जोर द्यायला पाहिजे असे डोवाल यांचे मत आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विरोधामुळे तेथील नागरी जीवनचा विकास होत नसल्याचे डोवाल यांनी 2010 मध्ये म्हटले होते. याचा पुनर्उच्चार त्यांनी 2016 मध्येही केला होता.