दगिन्यांसह रोकड ठेवलेली बॅग दोघांनी लांबविली

0

जळगाव । खाजगी ट्रॅवल्स बसमधून उतरल्यानंतर रस्त्यावरच राहून गेलेली महिलेची दिड तोळे सोने व वीस हजार रूपयांची रोकड ठेवलेली बॅग दोन भामट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. बॅग रस्त्यावर राहून गेल्याचे लक्षात येताच पुन्हा बॅग घेण्यासाठी आलेल्या महिलेस ती गायब झालेली दिसून आली. यातच पोलिसात तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात दोन जण दुचाकीवरून बॅग घेवून जात असताना दिसून आले आहे.

पाच बॅगांपैकी एक बॅग राहिली रस्त्यावरच
जळगाव येण्यासाठी राखी जैन या अहमदनगर येथून तर सपना जैन ह्या शिरड येथून एकाच खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये दोन्ही बहिणी बसल्या होत्या. सोमवारी सकाळी 6.25 वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी ह्या शहरातील आकाशवाणी चौकात उरतल्या. यावेळी त्यांच्याजवळ पाच बॅगा होत्या. दरम्यान, सकाळी वडील विलास जैन हे त्यांना घेण्यासाठी चारचाकीतून आले होते. बसमधून खाली बॅगा उतरवून दोन्ही बहिणी या चारचाकीत बसून घरी जाण्यासाठी निघून गेल्या. घरी आल्यानंतर आपण चारच बॅगा आणल्या असे लक्षात येताच दिड तोळे सोने व वीस हजार रूपयांची रोकड ठेवलेली पाचवी बॅग आकाशवाणी चौकातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आकाशवाणी चौक पुन्हा गाठले. मात्र, तेथून दागिने व पैसे ठेवलेली बॅग चोरीला गेल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दोघं भामटे कैद
दोन्ही बहिणींनी सकाळी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठत आकाशवाणी चौकातून बॅग चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. यावेळी रस्त्यावर पडलेली बॅग एक जण दुकानाजवळ येऊन ठेवतो. त्यानंतर दुसर्‍या फोन करून त्यास बोलवून घेतले. यानंतर दुसरा साथीदार दुचाकीवरून आल्यानंतर पहिल्याने बॅग उचलून साथीदारासोबत दुचाकीवरून धुम ठोकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.त्यानुसार चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत.