दबावतंत्राचा वापर करीत भाजपचा मस्तवालपणा वाढलाय! 

0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भाजपवर टीका  
राज्य गेल्यावर गलितगात्र आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका, असा दिला सल्ला 
नवी मुंबई – आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. सत्ता आलेल्या भाजपाचा मस्तवालपणा वाढल्याचे सांगत काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आणि आमदारांवर धाडी टाकून कसे दबावतंत्र भाजप टाकत, केंद्रातील सत्तेचा कसा दुरुपयोग करत असल्याची टीका पवार यांनी केली.
कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय( कवाडे गट ), सपा यांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा नवी मुंबईच्या विष्णूदास भावे सभागृहात पार पडला. या मेळाव्यात शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला केला.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर
देशाचे अर्थमंत्री राहिलेले पी.चिंदबरम यांच्यावर खटला भरुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे देशासाठीचे योगदानही हे लोक लक्षात घेत नाहीत. तर कोलकाताच्या ममता बनर्जी या दहा बाय दहाच्या खोलीत रहातात. त्यांचं कामही लोकांसाठी सुरु आहे. तिथे त्यांनी भाजपाची डाळ शिजू दिली नाही म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत त्यांच्या लोकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. असं कधी केंद्रातील सरकारने केल्याचं ऐकलं आहे का? असा सवाल शरद पवार यांनी करत भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.
या देशात उदयोग क्षेत्रात टाटा उदयोग समुहाचं योगदान चांगलं आहे. त्यांचं कुटुंब ठराविक रक्कम लोकांच्या हितासाठी वापरते. त्यासाठी त्यांची एक ट्रस्ट आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. याचा अर्थ हा आहे की, उदयोगातील घराणे सरळमार्गाने जात आहे. त्यांना नमवण्याचे काम सध्या भाजप सरकार करत आहे असेही पवार म्हणाले.
आज महाराष्ट्रातील चित्र बदलतंय याची प्रचिती मला येत आहे. लोकं आज पर्याय मागत आहेत. त्यामुळे परिवर्तन घडवायचं असेल तर एका विचाराचे लोक एकत्र यायला हवेत असेही पवार म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पालघर,भंडारा-गोंदिया निवडणूकांमध्ये घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला आणि त्यांनी गोंदियाच्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्या पध्दतीने वागले आहेत त्याची संपूर्ण माहिती आम्ही लेखी स्वरुपात मिळवली असून लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेवून त्यांना माहिती देणार असून त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले बनू नये असे सांगणार असून त्यांनी वेळीच सुधारणा केली नाही तर आम्ही त्यापुढील न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
धडा शिकवल्याशिवाय फंदफितुरी संपणार नाही- जयंत पाटील 
शिवाजी महाराजांच्या काळापासून फंदफितुरी पाचवीला पुजलेली होती. ती फंदफितुरी शिवाजी महाराजांनी मोडून काढली. आपण कोकण पदवीधर निवडणूकीमध्ये ताकदीने काम केले तर ज्या प्रवृत्ती पक्ष सोडून गेल्या आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही फंदफितुरी संपणार नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबईच्या मेळाव्यात डावखरे यांचे नाव न घेता केली.
महाराष्ट्रात भविष्यात काय घडू शकते याची चुणुक आजच्या या मेळाव्यातून दिसत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच पदवीधर मतदार हा आपल्या विचारांचा आहे. त्यामुळे तो कुणाच्या बाजुने जाईल असे वाटत नाही. आज सर्व पक्षांनी एकत्र येवून उत्तर देण्याची गरज आहे असे सांगतानाच ठाणे, पालघरमध्ये आघाडीने एकत्रित ताकद दाखवली तर भविष्यात विधानसभेचेही चित्र पालटायला वेळ लागणार नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. इतर पक्षात जास्त काम करणाऱ्याच्या पाठिशी ईडीचा ससेमिरा लावून त्यांना भाजपात प्रवेश देण्याची पध्दत अवलंबली जात आहे अशी जोरदार टिका जयंत पाटील यांनी केली. आज भाजप पडेल ती किंमत मोजून निवडणूका लढवत आहे. त्यामुळे गाफिल न रहाता शेवटच्या मतापर्यंत पोचा. आपापल्या तालुक्यात उमेदवार पोचू शकला नाही तरी पदाधिकाऱ्यांनी काम करायचे आहे असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.