दबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी अखेर केली आयुक्त शिंदेंची बदली

0

राज्यातील तब्बल २५ चर्चित अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

मुंबई :- बऱ्याच दिवसापासून पनवेल महापालिकेतील आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर पनवेलच्या आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे मुंबईत महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मुख्याधिकारी पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी तब्बल २५ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे यांच्या बदलीसाठी जीवाचे रान करणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी बदली केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुधाकर शिंदे हे पनवेलचे पहिले महापालिका आयुक्त होते. त्यांनी वर्षभराच्या कार्यकाळात शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यांच्या या कारवाईमुळे शहरातील अनेक रस्ते रहदारीसाठी मोकळे झाले होते. याशिवाय अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून त्यांनी पदपथ रिकामे केले होते. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ताब्यात असलेल्या पनवेल महापालिकेत शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे आठवड्यापूर्वीच नगर विकास विभागाने पनवेल महापालिकेचा हा ठराव फेटाळला होता. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे प्रशांत ठाकूर यांनी खाजगीत नाराजीही व्यक्त केली होती. तर शिंदे यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी रॅली काढून शिंदे यांना पदावर कायम ठेवण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पेचात सापडले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांची बदली करत या विषयाला पूर्णविराम दिला आहे.

अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांच्याही केल्या बदल्या
अहमदनगरचे महापालिका आयुक्त जी सी. मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे .तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी ए .एम महाजन यांना पाणीपुरवठा विभागात उप सचिव करण्यात आले आहे . मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नवी मुंबईच्या पणन विभागात बदली करण्यात आली आहे. तर जालन्याचे जिल्हाधिकारी एस .आर. जोंधळे यांना मुंबई जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संजय यादव यांची एमएमआरडीए मधून थेट अकोल्याच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आता पुणे जिल्हाधिकारी असतील. तर नवलकिशोर यांच्या जागी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगर जिल्हाधिकारी पदी बदली नाकारण्यात अली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेत आणण्यात आले असून त्यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे.