छोट्या व्यवसायातून सुनीता करते उदरनिर्वाह
पिंपरी : माझे शिक्षण जास्त नसल्यामुळे मला चांगली नोकरी लागली नाही. कधी कॅलेेंडर तर कधी अगरबत्ती विकून उदरनिर्वाह चालू आहे. मला लोकांनी दया दाखवू नये, मला तसे आववडत नाही. दया दाखविण्यापेक्षा मार्गदर्शन करा, ते आवडेल, असे मत निगडी येथील अंध सुनीता यांनी व्यक्त केले. जागतिक महिलादिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली वेदना व्यक्त केली. अंध आणि आजारी पतीच्या सहाय्याने ती एकटीच संसाराचा गाडा ओढते आहे.
संसाररथाची दोन असतात. ती चाके म्हणजे पती आणि पत्नी. जर एक चाक लडखडू लागले की दुसर्याने त्याला आधार द्यायचा. पण मुळातच जेव्हा दोन्ही चाके कमकुवत असतील तर संसाराचा गाडा हाकणे अक्षरश: जीवावर येते. अशावेळी बर्याचदा घरच्या स्त्रीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडते. सुनीताची कहाणी अशीच आहे. ती स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंध तर पतीच्या दोन्ही डोळ्यातील ज्योती विझलेल्या. दोघांसाठी अंधार हाच सोबती. पण सुनीता मोठ्या हिमतीने छोटे छोटे व्यवसाय करून आपण आणि आपल्या पतीचा उदरनिर्वाह करीत आहे. अशा महिलांना समाजाकडूनही मदतीचा हात मिळाला तर खर्या अर्थाने आजचा जागतिक महिला दिवस सार्थकी लागेल.
सुनीता ही जन्मतः अंध असून वडगाव मावळ हे तिचे माहेर तर सासर सातारा आहे. माहेरची परिस्थिती बेताचीच असून तिला तीन भावंडे त्यापैकी एक भाऊ दृष्टिहीन. लहान वयातच सुनीताच्या घरच्यांनी तिचे लग्न दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या सचिन याच्याशी लावले. त्यामुळे अंधार हा तिचा जन्मोजन्मीचं सोबती झाला. लग्नानंतर उदरनिर्वाहासाठी उद्योगनगरीत हे दाम्पत्य दाखल झाले. निगडीच्या ओटा स्कीम मध्ये राहून सुरु झाली जगण्याची धडपड. त्यासाठी सुनीता छोटे छोटे व्यवसाय करीत आहेत. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही.
एकटीच्या खांद्यावर भार
त्यामुळे नवीन वर्ष आले की कॅलेंडर विक्री, दिवाळी आली की अगरबत्ती, रक्षाबंधन आले की राख्या तयार करणे, असे छोटे-मोठे व्यवसाय करून ती आपले आणि आपल्या नवर्याचे पोट भरते. नवरा देखील त्याला जमेल तेवढी मदत करीत असतो. नियतीला त्यांचे एवढेसे सुख देखील पाहावले नाही. सचिनचा एक पाय अपघातामुळे निकामी झाला आहे. उपचारासाठी पैसे नाहीत त्यामुळे आज तो घरीच असतो. त्यामुळे सुनीता आपल्या एकटीच्या खांद्यावर संसाराचा भर उचलत आहे. कधी आयुष्यात चांगली माणसे येतात आणि आपल्याला मदतीचा हात देऊन जातात.
दया नको, मार्गदर्शन हवे
दत्तू चांदगुडे यांनी तिला मुंबईला अंध व्यक्तींसाठी विविध कोर्सचे प्रशिक्षण देणार्या महालक्ष्मी संस्थेमध्ये पाठवले. त्या प्रशिक्षणामुळे मला मोठा आधार मिळाला. ‘देव जरी जगात नसला तरी देवासारखी माणसे या जगात आहेत. हे मी दृष्टीहीन असूनही अनुभवले आहे ’ असे सुनीता सांगते. आजच्या जागतिक दिनानिमित्त ती म्हणते की दया नको, भीक नको हवे आहे ते फक्त मार्गदर्शन. जीवनांत खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपले आशीर्वाद. चांगल्या कामाची संधी द्या डोळस महिला जशा काम करतात त्यापेक्षाही सरस काम आम्ही दृष्टीहीन महिला करू शकतो असा तिने आत्मविश्वास व्यक्त केला.