मंत्रालयात ग्रामीण विकास मंत्र्याकडे आयोजित सरपंच दरबारात गोंधळ
मुंबई: राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून सरपंच दरबार सुरू झाला आहे. राज्यातील निमंत्रित सरपंचासाठी मंत्रालयात सरपंच दरबाराचे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या सरपंच दरबारासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून सरपंच आले होते. यात महिला सरपंचाचा सहभागही होता. महिला सरपंचासोबत त्यांचे पती देखील आले होते. सरपंच परिषदेसाठी आलेले हे सरपंच पतिराज दरबारात जाण्यासाठी मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर गोंधळ घालत असल्याचे चित्र होते. अखेर मंत्र्यांच्या आदेशानुसार सुरक्षारक्षकांनी त्या हौशी पतिराजांना बाहेर काढले.
सुरक्षारक्षकांनी काढले बाहेर
महिला सरपंचाच्या पतीराजांनी तसेच काही हौशी कार्यकर्यांनी खालच्या गेटवरून प्रवेश मिळविला खरा मात्र मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर असलेल्या सभागृहात बसण्यासाठी जागा ही कमी असल्यामुळे महिला सरपंचाच्या पतीराजांना मात्र आत सोडण्यात येत नव्हते. पतीराजांना आत सोडले जात नसल्याने या सरपंच पतीराजांनी काही वेळ मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर गोंधळ घातला. सरपंच पतीराजाचा वाढता गोंधळ पाहून खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आतमधून निरोप पाठवून महिला सरपंचाच्या पतीराजांनी माझ्या केबिनमध्ये बसावे असे सांगितले. त्यानंतर सभागृहा बाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी या गोंधळ घालणाऱ्या पतीराजांना तेथून बाहेर काढले.
सरपंचांचीही झाली गैरसोय
सरपंच दरबारासाठी राज्यातील ठराविक सरपंचाना निमंत्रित करण्यात आले होते. राज्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणाऱ्या सरपंच यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि सरकारने काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी सरपंच दरबार ही संकल्पना नव्याने राबविण्यात येत आहे. आपले प्रश्न थेट मंत्रीमहोदयांना सांगता येणार असल्यामुळे या सरपंच दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच या दरबाराचे नियोजनही कोलमडल्याचे पाहायला मिळाले. दरबारासाठी आलेल्या अनेक सरपंच ना बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही. तसेच अनेक सरपंच हे सभागृहात जाऊ शकते नाहीत .