रावेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांना संधी की भाजपा भाकरी फिरवून देणार नवीन चेहरा ! : रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपाला शहरी भागातून प्रतिसाद नाही ; अनेक इच्छुक
रावेर (शालिक महाजन) – लोकसभा निवडणुकीत देशभरात दुसर्यांदा आलेल्या मोदी लाटेनंतर आता विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागली आहे. रावेर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास दर निवडणुकीला येथे नवीन चेहर्याला पसंती देणार्या मतदारांकडून या वेळच्या निवडणुकीत विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे यांना कौल मिळतो की भाजपा भाकरी फिरवून नव्या चेहर्याला संधी देतो की विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पूर्वीचा रावेर व आताचा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात कोणत्याही आमदाराने सतत दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले नाही त्यामुळे प्रत्येक विधानसभेला नवीन चेहरा देणार्या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत कौल कुणाला असणार ? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीकडे लागले लक्ष
सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाचे आमदार हरीभाऊऊ जावळे करीत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार जावळे स्वतः इच्छूक आहेत. शिवाय आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला या मतदारसंघातून 39 हजार 329 मतांची लीड मिळाली असली तरी विधानसभेत हेच चित्र कायम ठेवण्यात भाजपाला कितपत यश मिळणार हेदेखील काळच ठरवणार आहे. लोकसभा निवडणुकीतील चित्र वेगळे व विधानसभा निवडणुकीतील चित्र वेगळे असा सहसा मतदारांचा कल राहणार असल्याने आगामी निवडणुकीत काय होणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
भाजपाला शहरी भागातून प्रतिसाद नाही
रावेर-यावल विधासभा मतदार संघात तीन प्रमुख नगरपालिका येतात. यामध्ये रावेर, यावल, फैजपूर या शहरी भागात येतात. यामध्ये भाजपाच्या विजयी उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना यावल शहरातून 392, फैजपूर शहरातून 220 तर रावेर शहरातून एक हजार 657 मतांची लीड मिळाला आहे. तीनही पालिकेतून भाजपाला दोन हजार 269 मतांचा लीड मिळाला असून यापेक्षा छोट्याश्या केर्हाळा गावातून भाजपाला दोन हजार 279 मतांची लीड मिळला आहे. यामुळे भाजपाची स्थिती शहरी भागात भयानक व चिंताजनक आहे.
विधानसभेसाठी विद्यमान आमदारांसह अनेक इच्छूक
रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसठी विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे इच्छूक आहेत. त्या शिवाय जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यादेखील निवडणूक रींगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्या सोबतच यावलचे नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, अतुल पाटील, भरत महाजन, पद्माकर महाजन, सुरेश धनके, डॉ.अनंत अकोले आदीदेखील इच्छूक आहेत. इच्छुकांचा आकडा डझनभर असलातरी प्रत्यक्षात मतदारसंघातील जनसंपर्क व केलेल्या विकासकामांच्या आधारे उमेदवारी दिली जाते त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळते? याकडे लक्ष लागले आहे.