सांगवी : सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून काटावणी, एक्सा ब्लेड कटर, चॉपर, कोयता अशी घातक अवजारे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई काटेपुरम चौक येथे पहाटे करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मूळचे नेपाळ येथील आहेत. भीमराज नाथ (वय 34, रा. काटेपुरम चौक), गिरी सिंग (वय 35, रा. काटेपुरम चौक), लक्ष्मण टमाटा (वय 32), जनक ढकाल (वय 30, दोघे रा. कल्याण फाटा), रमेश आहुजा (वय 43, रा. रघुनाथ रोड, बांद्रा वेस्ट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपुरम चौक, सांगवी येथे श्री ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. पाचजण या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वजण नर्मदा गार्डन लॉन्स जवळ असलेल्या दावल भंगार सेंटरच्या मागच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे सव्वा तीन वाजता त्या ठिकाणी सापळा रचून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावण्या, सॅकबॅग, एक्सा ब्लेड कटर, नायलॉन दोरी, स्टीलचा चॉपर, लोखंडी कोयता, कापडी मास्क, कानटोपी असा 1430 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण श्री ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. यावरून पाच जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.