हडपसर : दर्जाहीन आणि नियोजनशून्य रस्त्यांच्या कामामुळे मांजरीवासिय त्रस्त झाले आहेत. रस्त्यातील वृक्ष, पोल न काढता ठेकेदाराने काम सुरू ठेवल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांचे अतोनात हाल होऊन वाहतूककोंडी होत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सांडपाणी वाहिन्या घाईघाईने टाकण्यात आल्या आहेत, खोदलेल्या खड्ड्यांवर माती ढकलण्यात आली असून चढउतार तयार झालेले आहेत. त्यात गोपाळपट्टी ते घुले वस्ती दरम्यान पावसाने खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र यावर कसल्याही उपाययोजना ठेकेदार आणि बांधकाम विभागाने केल्या नाहीत. 3.25 कोटींचा निधी वीजवाहिन्या भूमिगत करणे, पोल हटवणे व ट्रान्सफार्मर स्थलांतरित करणे याकरीता आवश्यक असताना त्यांचा समावेश सार्वजनिक बांधकाम विभागाने न केल्याने हे काम प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.