दर्यापूर सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

0

गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष : सदस्यांचा आरोप

वरणगाव- दर्यापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील कोळी यांचे गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने काम करीत असल्याने उपसरपंचासह सदस्यांनी सोमवारी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे परीसरातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीचे सरपंच गेल्या तीन वर्षापासून सुनील कोळी यांच्याकडे आहे मात्र सरपंच गावातील समस्याकडे दुर्लक्ष करीत असून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने काम करतात, असा आरोप करीत अविश्‍वास प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावावर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आशा मेघे, सदस्या कुसूम गायकवाड, अपेक्षा शिंदे, छाया तायडे, अनिता लोखंडे, लक्ष्मी सपकाळे, वंदना चौधरी, अनिता पाटील, सदस्य बोधीसत्व अहिरे, नितीन सोनवणे, राजेश शिंदे, रामदास खोंडे, गणेश गावंडे, अजय चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.