दर रविवारी पेट्रोलपंप बंद

0

मुंबई : दूचाकी आणि चारचाकी गाडीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील साडेचार हजार पेट्रोलपंप 14 मे पासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पेट्रोलपंप चालकांकडून रविवार हा सुट्टीचा दिवस समजला जाणार आहे. यासोबत इतर दिवशी म्हणजेच सोमवार ते शनिवार दरम्यान पेट्रोलपंप सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पेट्रोलपंप चालकांनी घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबद्दल सूचना देऊनही पेट्रोलपंप चालक निर्णयावर ठाम आहेत.

पेट्रोलपंप मालकांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका मुंबईतील 225 पेट्रोलपंपांवरील सेवेला बसणार आहेत. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. पेट्रोलपंप चालकांना मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार आहेत. 2011 पासून कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याचे पेट्रोलपंप मालकांचे म्हणणे आहे.

आम्ही सध्या अतिशय तुटपुंज्या कमिशनवर काम करत आहोत. शिसेरहित पेट्रोल/डिझेलच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांचे मोठे नुकसान होते. यासोबतच इतरही अनेक गोष्टींमुळे पेट्रोलपंप चालकांना तोट्याला सामोरे जावे लागते, असे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांना किमान वेतन द्यावे लागते. मात्र पेट्रोलपंप चालवण्यासाठी येणारा खर्च अतिशय जास्त आहे. त्यामुळे पेट्रोलपंप व्यवसायातून मिळणारा नफा अतिशय कमी झाला आहे, असे देखील लोध यांनी म्हटले आहे.

पेट्रोलपंप कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा?
रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा, तर इतर दिवशी केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत पेट्रोलपंप सुरू ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. याचा फटका पेट्रोलपंपावर काम करणार्‍या जवळपास 1 लाख कर्मचार्‍यांना बसणार आहे. कारण पेट्रोलपंपावरील कर्मचारी दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करतात. रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवल्याने आणि इतर दिवशी केवळ एकाच शिफ्टमध्ये पंप सुरू ठेवल्याने पेट्रोलपंप चालवण्यासाठी येणार्‍या खर्चात घट होईल, असा दावा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केला आहे.